मुंबई : कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांसाठीच्या २,४१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरू आहे. मात्र कोनमधील घरे घेण्यास विजेते कामगार उत्सुक नाहीत. आतापर्यंत घराचा ताबा देण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही अंदाजे ११०० विजेत्यांनी अद्यापही घराचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे या विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि घराचा ताबा देण्यासाठी मंडळाने पुन्हा एका ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
म्हणून ताबा घेण्यासाठी विजेते पुढे येईनात
गिरणी कामगारांसाठी मुंबईत पुरेशी घरे नसल्याने राज्य सरकारने एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील काही घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१६ मध्ये कोनमधील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील २४१७ घरांसाठी सोडत काढली. या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र मोठ्या संख्येने गिरणी कामगार घराचा ताबा घेण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मुळात कोनमधील घरे मुंबईपासून बरीच दूर आहेत. घरांची दुरूस्ती झाली असली तरी ती योग्य प्रकारे झाली नसल्याने ताबा घेतलेल्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यात सुविधांचाही अभाव आहे.
पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, अनेकदा उद््वाहक बंद असतात. घराचा ताबा घेतलेले विजेते यासह अनेक समस्यांमुळे ग्रासले आहेत. याच पार्श्वभूमीवर उर्वरित विजेते कामगार घरांचा ताबा घेत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच २,४२७ पैकी अंदाजे १,१०० विजेत्या कामगारांनी अद्यापही ताबा घेतलेला नाही, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याआधीही विजेत्यांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनंतरही अद्याप अंदाजे ११०० घरांचे वितरण बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. तर विजेते ताबा का घेत नाहीत याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.
घरांचा ताबा घेण्यासाठी अंदाजे ११०० विजेत्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारपासून ही मुदतवाढ लागू होईल. या मुदतीत विजेत्यांनी कागदपत्रे सादर करून ताबा घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. दरम्यान ही शेवटची मुदतवाढ असेल का याबाबतही अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही विजेते पुढे येत नसल्याने किती वर्षे त्यांची वाट पाहायची हा प्रश्न आहे. यामुळे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनाही घरासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना किती दिवस वाट पाहायला लावायची, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याची चर्चा आहे. मात्र ही शेवटची संधी असणार का, त्यानंतर विजेते पुढे न आल्यास प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाणार का याबाबत कोणतीही स्पष्टता मुंबई मंडळाकडून देण्यात आलेली नाही.
