मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने अखेर मंगळवारी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत १२० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या घरांसाठी इच्छुकांना गुरुवार, ५ फेब्रुवारीपासून नोंदणी करता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबईकरांना सोडतीशिवाय म्हाडाचे घर विकत घेता येणार आहे. मात्र ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून उच्चवर्गीयांसाठीच ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आहे. या योजनेतील अधिकाधिक घरे ही दोन कोटी ते आठ कोटींच्या दरम्यानची आहेत. ताडदेवमधील घरांच्या किंमती आठ कोटी रुपये आहे. तर वडाळ्यातील घराची किंमत ४२ लाख रुपये आहे. २०२४ मधील घरांच्या किंमती आणि प्रथम प्राधान्य योजनेतील त्याच घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

मुंबई मंडळाच्या सोडतीतील महागड्या घरांची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे मंडळाने ही घरे दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडतीत समाविष्ट केली. मात्र तरीही या घरांची विक्री न झालेल्या त्यांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता पहिल्यांदाच मुंबईत ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत घरांची विक्री केली जात आहे.

यासाठी गुरुवारपासून बुक माय होम संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पाच-सहा दिवसांनी घर विक्रीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम घराची नोंदणी आणि अनामत रक्कम भरणाऱ्याला या घराचे वितरण केले जाणार आहे. मात्र अनामत रक्कम भरल्यापासून ४८ तासांच्या आत संबंधित अर्जदाराला घराच्या एकूण विक्री किंमतीच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे. अन्यथा त्याचा घरावरील दावा संपुष्टात येईल आणि त्या घरासाठी पुढील अर्जदार दावा करू शकेल.

त्यामुळे इच्छुकांना लाखो रुपयांची अनामत रक्कम आणि घराची १० टक्के रक्कम आठवड्याभरात तयार ठेवावी लागणार आहे. या योजनेतील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

महागडी घरे विकली जात नसल्याने ती ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विकली जात असल्याचे सांगणाऱ्या मंडळाने घरांच्या किंमतीत बरीच वाढ केली आहे. जे घर २०२४ च्या सोडतीत अंदाजे पावणे सात कोटीत विक्रीसाठी समाविष्ट करण्यात आले होते, ताडदेवमधील अंदाजे दीड हजार चौरस फुटांच्या त्याच घराची किंमती आठ कोटी केली आहे. तर वडाळ्यातील २०२४ मधील ४० लाखांच्या घराची किंमत आता ४२ लाख केली असून जुहू, जेव्हीपीडी, लोअर परळ सर्वच ठिकाणच्या घरांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे उच्चभ्रूंसाठीच असल्याची चर्चा सुरू असून ही घरे या योजनेअंतर्गत तरी विकली जातील का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एक ते सहा लाख रुपये अनामत रक्कम

मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी उत्पन्न गटाप्रमाणे १५ हजार ते दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम असते. पण ‘प्रथम प्राधान्य’साठी थेट एक लाख, दोन लाख, तीन लाख, चार लाख, पाच लाख आणि सहा लाख अशी अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही रक्कम जमविणेही सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यानंतर १० टक्के विक्री किंमत जमा करण्याचेही आव्हान असणार आहे.

१२ फेब्रुवारीपासून घरविक्री

मुंबईतील १२० घरांसाठी गुरुवारी सकाळी ११ पासून नोंदणी सुरू होणार आहे. तर १२ फेब्रुवारीपासून घर विक्री सुरू होणार आहे. या योजनेतील शेवटचे घर विकले जाईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.