मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीच्या निकालाची सुमारे ७५ हजार अर्जदारांना मागील कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मागील चार महिन्यांपासून या अर्जदारांची अनामत रक्कम अडकून असल्याने अर्जदार आर्थिक अडचणीत आले होते. पण आता मात्र अर्जदारांची ही प्रतीक्षा संपली आहे. सोडतीसाठी अखेर मुंबई मंडळाला मुहूर्त मिळाला आहे. ६ ऑगस्ट रोजी, गुरुवारी सोडत काढली जाणार आहे.
बोरिवली, गोरेगाव, जुहू, वांद्रे, दादर, ताडदेव, विक्रोळी आणि अन्य ठिकाणच्या २६४० घरांसाठी मंडळाने ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट अशा सर्व गटातील घरांचा यात समावेश होता. वेळापत्रकानुसार १५ मे रोजी सोडत काढली जाणार होती. मात्र अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेदरम्यान सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने एप्रिलच्या अखेरीस सोडतीस मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढीनुसार ५ जून रोजी सोडत होणार होती.
मात्र या मुदतवाढीदरम्यानही सोडतीस प्रतिसाद मिळत नसल्याने दुसऱ्यांदा अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली. दुसऱ्या मुदतवाढीनुसार जूनअखेरीस अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून, ७५ हजार १२७ पात्र अर्जांची अंतिम यादी १६ जून रोजी मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या मुदतवाढीच्या वेळापत्रकात सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. सोडतीची तारीख नंतर जाहीर करू, असे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र अर्जांची अंतिम यादी जाहीर होऊन दीड महिना उलटून गेला तरी सोडतीची तारीख जाहीर होत नसल्याने अर्जदार संतप्त झाले होते.
अर्जदारांनी १० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतची अनामत रक्कम क्रेडिट कार्ड, उसनवारी वा कर्जाच्या माध्यमातून भरली आहे. अशावेळी सोडत लांबल्याने त्यांची ही रक्कम अडकून पडल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे मुंबई मंडळाच्या कारभारावर टीका होत होती. सोडत काढण्याबाबत म्हाडा उदासीन असल्याचा आरोप होत होता. प्रसारमाध्यमांतूनही म्हाडावर टीका होत होती. सोडतीची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत होती. सोडतीसाठी प्रमुख पाहुण्यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली होती. पण अखेर आता सोडतीला मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात दुपारी १२ वाजता सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.
