मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या सोडतीसाठी अनामत रक्कमेसह ७५ हजार ३७४ अर्ज सादर झाले होते. या अर्जांची छाननी करून मुंबई मंडळाने मंगळवारी पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार ७५ हजार १२७ अर्ज पात्र ठरले असून हे अर्जदार आता सोडतीत सहभागी होणार आहेत. तर २४७ अर्जदार अपात्र ठरल्याने त्यांना पुढील सोडतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, सोडतपूर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र सोडत कधी काढणार हे अद्याप मंडळाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. सोडतीच्या तारखेची अर्जदारांना प्रतीक्षा असून लवकरात लवकर सोडतीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी अर्जदारांकडून होत आहे.

सोडतपूर्व प्रक्रियेस दोन वेळा मुदतवाढ

मुंबई मंडळाने बोरिवली, गोरेगाव, अंधेरी, जुहू, वांद्रे, दादर, ताडदेव, पवई, विक्रोळी आदी ठिकाणच्या २,६४० घरांसाठी ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया मूळ वेळापत्रकानुसार ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार होती. मात्र सोडतीला प्रतिसादच न मिळाल्याने मंडळाने या प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीनुसार अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रिया १५ मे रोजी संपुष्टात येणार होती. मात्र या मुदतीतही चालू बांधकाम प्रकल्पातील कन्नमवार नगरमधील घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने दुसऱ्यांदा अर्जविक्री – स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवली. दुसऱ्या मुदतवाढीनुसार २९ मे रोजी अर्जविक्री – स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात आली. या मुदतीत अनामत रक्कमेसह ७५ हजार ३७४ अर्ज दाखल झाले. या अर्जांची छाननी करून मंडळाने पात्र अर्जांची प्रारूप यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली.

त्यानंतर सूचना-हरकती लक्षात घेऊन मंगळवारी ३ वाजता पात्र अर्जांची अंतिम यादी मंडळाने प्रसिद्ध केली. या यादीनुसार ७५ हजार १२७ अर्जदार पात्र ठरले असून २४७ अर्जदार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सोडतीत ७५ हजार १२७ अर्जदार सहभागी होणार आहेत.

विखुरलेल्या घरांसाठी सर्वाधिक अर्ज

सोडतीत विखुरलेल्या ३१९ घरांचा समावेश होता. या घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून अंतिम यादीनुसार या घरांसाठी ३६ हजार ४०३ अर्ज सादर झाले आहेत. तर ३३ (५)अंतर्गत सोडतीसाठी ३७१ घरे उपलब्ध झाली होती. या घरांसाठी २३ हजार ३२० अर्ज सादर झाले आहेत. त्याचवेळी ३३ (७) योजनेतील १८८ घरांसाठी केवळ २ हजार २३० अर्ज दाखल झाले आहेत. सोडतीत सर्वाधिक घरे ही चालू बांधकाम प्रकल्पातील होते. मात्र या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तब्बल १७६२ घरांचा समावेश असताना यासाठी केवळ १३ हजार १७४ अर्ज आले आहेत. मंडळाने पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करून सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता अर्जदारांचे डोळे सोडतीकडे लागले आहेत. मात्र सोडतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

आधी दोन मुदतवाढींमुळे सोडतीची तारीख लांबणीवर गेली. तर आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडत रखडली आहे. आचारसंहिता २२ जून रोजी संपुष्टात येणार असून यासाठी आठवड्याभराचा कालावधी राहिला आहे. असे असतानाही मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्याची हालचाल सुरू झालेली नाही. त्यामुळे सोडत कधी होणार असा प्रश्न अर्जदारांना पडला आहे. दरम्यान, अनेकांनी कर्ज काढून, उसनवारीने, क्रेडिट कार्डने अनामत रक्कम भरली आहे. काही जणांनी अनामत रक्कम भरून अडीच महिने उलटले आहेत. त्यामुळे अनेक अर्जदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सोडत लवकरात लवकर काढावी, अशी मागणी अर्जदारांकडून केली जात आहे. याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता लवकरच तारीख जाहीर होईल असे सांगण्यात आले.