मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या २६४० घरांसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती सुरू आहे. या प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार संगणकीय पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आता केवळ चार दिवस तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांनी त्वरा करून अर्ज भरणे गरेजचे आहे.
दुसरीकडे मुंबई मंडळाच्या या सोडतीला मुदतवाढीनंतरही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. कारण अर्जस्वीकृतीसाठी पाच दिवस शिल्लक असताना रविवार दुपारपर्यंत २६४० घरांसाठी केवळ ४३ हजार ५०१ अर्ज सादर झाले आहेत. हा प्रतिसाद अत्यल्प असून अर्जस्वीकृतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत जेमतेम ५० ते ५५ हजारांपर्यंत अर्ज सादर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मुंबई मंडळाला मिळालेल्या मागील काही वर्षांतील हा अत्यल्प प्रतिसाद ठरणार आहे.
मार्चअखेरीस मंडळाने २६४० घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुकांना दिलासा दिला. मात्र या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी पुरेशी घरे नसल्याने आणि सर्वच घरांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसल्याने इच्छुकांच्या पदरी निराशी पडली. परिणामी या सोडतीला प्रतिसाद मिळाला नाही. ३० मार्च ते २७ एप्रिल दरम्यान अनामत रक्कमेसह केवळ २९ हजार ६१० अर्ज सादर झाले. हा प्रतिसाद अत्यल्प असल्याने अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची वेळ मंडळावर आली. त्यानुसार १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीमुळे १५ मे रोजी काढली जाणारी सोडत लांबणीवर गेली. नवीन वेळापत्रकानुसार ५ जून अशी सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली.
मुदतवाढीनंतर अर्जविक्री-स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा मंडळाला होती. मात्र अद्यापही सोडतीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. २०२४ मधील २०३० घरांसाठी १ लाख १३ हजार अर्ज सादर झाले होते. तर २०२३ च्या ४०८२ घरांसाठी १ लाख २२ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले होते. मात्र २०२६च्या सोडतीकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत ६४ हजार ७६५ जणांनी अर्ज भरले आहेत. तर यातील केवळ ४३ हजार ५०१ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहे.
अनामत रक्कमेसह दाखल झालेले अर्जच सोडतीसाठी पात्र ठरतात. अशावेळी अर्ज भरण्यासाठी चार दिवस तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी केवळ पाच दिवस आता शिल्लक आहे. त्यामुळे या मुदतीत ५० ते ५५ हजारांच्या दरम्यान अनामत रक्कमेसह अर्ज सादर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महागड्या घरांमुळे इच्छुकांची माघार
मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर घेणार्या इच्छुकांची संख्या आजही प्रचंड आहे. मात्र सोडतीतील घरांच्या किंमती पाहता अनेकांनी सोडतीतून माघार घेतल्याचे चित्र आहे. अत्यल्प गटासाठी मूळात घरे कमी असून आहे त्या घरांच्या किंमती त्यांना न परवडणार्या आहेत. तर अल्प गटातील इच्छुकांच्या उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किंमतीत प्रचंड तफावत असल्याने घरासाठी गृहकर्जच उपलब्ध होणार नसल्याने या गटातील इच्छुकांनीही माघार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच २६४० घरांच्या सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करा
घरे महाग असल्याच्या टीकेनंतर मंडळाने सोडतीतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील १२२१ घरांच्या किंमती साडे सात टक्क्यांनी कमी केल्या आहेत. मात्र त्यानंतरही इच्छुकांमध्ये, अर्जदारांमध्ये नाराजीच आहे. साडे सात टक्क्यांनी किंमती कमी केल्यानंतर तसा कोणाताही फायदा होत नसल्याचे म्हणत घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी होत आहे. तसे पत्रही राजकीय पक्षांकडून मंडळाला देण्यात येत आहेत. विक्रोळीच नव्हे तर सोडतीतील सरसकट घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी होत आहे. मात्र यावर म्हाडाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सोडतीसाठी आता काही दिवसच शिल्लक असल्याने म्हाडा याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून आपले सरकार संकेतस्थळात काही दिवसांपासून सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला, वास्तव्याचा दाखला अशी कागदपत्रे मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळेही अनेकांना अर्ज भरता येत नसल्याने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला पुन्हा काही दिवस मुदतवाढ देण्याही मागणी होत आहे. आता अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपुष्टात येण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असल्याने यावर काही निर्णय होतो का हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
