मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेनुसार नोंदणी, अर्जविक्रीसाठी दोन दिवस, तर अनामत रक्कमेसह अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. असे असताना या सोडतीला मागील काही वर्षांतील सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २६४० घरांसाठी ४६ हजार १०८ अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. या सोडतीत बहुतांश घरे महागडी, न परवडणारी आहेत, त्यामुळे या घरांकडे इच्छुकांनी पाठ फिरवली आहे.
५ जूनला सोडत मुंबईतील बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, जुहू, वांद्रे, दादर, ताडदेव, विक्रोळी, कन्नमवारनगर या ठिकाणच्या २६४० घरांसाठी मार्चअखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या सोडतीसाठी ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली. इच्छुकांना २९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार होते. तर ३० एप्रिलपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून १५ मे रोजी सोडत काढली जाणार होती. मात्र या सोडतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
२७ एप्रिलपर्यंत केवळ २९ हजार अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाल्याने मंडळावर सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवली. त्यानुसार २७ एप्रिलला सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची, १५ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. सोडत १५ मेवरून ५ जूनवर गेली. या मुदतवाढीनुसार आता अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. पण मुदतवाढीनंतरही सोडतीचा प्रतिसाद वाढलेला नाही.
याआधी सोडतीला लाखोंनी प्रतिसादम्हाडाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१२ मे) दुपारी २ पर्यंत २६४० घरांसाठी ६८ हजार ९४ जणांनी अर्ज भरले आहेत. तर यापैकी केवळ ४६ हजार १०८ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित तीन दिवसांत दाखल अर्जांची संख्या ५० ते ५५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मुंबईतील सोडतीला मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रतिसाद ठरेल. याआधी काही हजार घरांसाठी चार ते पाच लाख अर्ज दाखल झाले होते.
२०२४ मधील २०३० घरांसाठी १ लाख १३ हजार अर्ज सादर झाले होते. तर २०२३ च्या ४०८२ घरांसाठी १ लाख २२ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले होते. असे असताना २०२६ मधील २६४० घरांसाठी आतापर्यंत केवळ ४६ हजार अर्ज सादर झाले असून ५० ते ५५ हजारांपर्यंत अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. या सोडतीतील घरे अत्यंत महाग असल्याने, अत्यल्प व अल्प गटातील घरेही सर्वसामान्यांना न परवडणारी असल्याने सोडतीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सोडतीतील एक कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले. म्हाडाच्या महागड्या घरांकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
