मुंबई : मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना म्हाडाचा आधार आहे. त्यामुळेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले असते. सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि काही हजार घरांसाठी लाखोंनी अर्ज सादर होतात. असे असताना १५ मे रोजी काढल्या जाणाऱ्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीकडे मात्र इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

या घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळत असून अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असतानाही अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची संख्या २१ हजारांच्या घरात आहे. शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या ३० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आजवरच्या मुंबई मंडळाच्या सोडतीला मिळालेला सर्वात अत्यल्प प्रतिसाद ठरणार आहे. दरम्यान, यावेळी मुंबई मंडळाच्या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी कमी घरे आहेतच, मात्र त्याचवेळी सर्वच गटातील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. खासगी विकासकांच्या घरांच्या किंमतींच्या जवळ जाणाऱ्या या किंमती आहेत. त्यामुळे म्हाडाची परवडणारी घरे आम्हाला परवडत नसल्याचे म्हणत मोठ्या संख्येने इच्छुकांनी यावेळी अर्ज करणे टाळल्याचे चित्र आहे.

मुंबई मंडळाने २६४० घरांसाठी ३० मार्चला जाहिरात प्रसिद्ध करून त्याच दिवसापासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात केली आहे. सोडतपूर्व प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार २९ एप्रिलपर्यंत संगणकीय पद्धतीने अर्ज भरून अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत संपण्यासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. असे असताना या सोडतीला फारसा प्रतिसादच मिळालेला नाही. म्हाडाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत २६४० घरांसाठी ३४ हजार ७६५ जणांनी अर्ज भरला आहे.

यापैकी केवळ २० हजार ७९० रहिवाशांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. अनामत रकमेसह सादर झालेले अर्जच सोडतीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे आतापर्यंत अर्जांची संख्या २१ हजारांच्या घरात असून हा प्रतिसाद आतापर्यंतच्या सोडतीला मिळालेला सर्वात कमी प्रतिसाद आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यानुसार २०२४ मधील २०३० घरांसाठी १ लाख १३ हजार अर्ज सादर झाले होते. तर २०२३ च्या ४०८२ घरांसाठी १ लाख २२ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले होते. असे असताना १५ मे २०२६ च्या सोडतीत २६४० घरांसाठी आतापर्यंत २० हजार ७९० अर्ज आले आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या जेमतेम ३० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रतिसाद असणार आहे.

मुदतवाढ देण्याची नामुष्की

सोडतीचा प्रतिसाद पाहता इच्छुकांनी मुंबई मंडळाच्या घरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या उत्पन्न गटाकडून सर्वाधिक म्हाडाच्या घरांना मागणी असते त्या गटासाठी सोडतीत कमी घरे आहेत. सोडतीत समाविष्ट घरांची किंमत परवडणारी नाही. महत्त्वाचे म्हणजे अल्प गटातील घरांच्या किंमतींनी कोटीचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे अल्प, मध्यम आणि उच्च गटातील घरांच्या किंमती एक कोटी ते सात कोटीपर्यंत आहेत. या महागड्या घरांमुळेच सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. हा प्रतिसाद पाहता मंडळाला नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुदतवाढीबाबत सोमवार – मंगळवारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

किंमती कमी करा

म्हाडाच्या घरांना प्रतिसाद मिळत नसून प्राप्त झालेले अर्ज एक कोटीच्या आतील घरांसाठी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोट्यवधींच्या घरांना प्रतिसाद मिळत नसून याआधीच्या सोडतीतील एक ते सात कोटीपर्यंतच्या घरांनाही प्रतिसाद मिळालेला नाही. दोनपेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे विकली न गेल्याने महागड्या घरांची विक्री मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर केली जात आहे. मात्र अजूनही ६४ महागडी घरे रिक्त असून प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गतही ती विकली गेलेली नाहीत.

असेच काहीसे आता २६४० घरांच्या सोडतीतील महागड्या घरांबाबत होण्याची शक्यता आहे. ही घरे विकली जाणार नसून ती रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी इच्छुक, अर्जदारांकडून होत आहे. या मागणीनुसार मंडळाने घरांच्या किंमती कमी करण्याचे संकेत दिले आहेत, मात्र त्यासाठीच्या कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आलेल्या नाहीत. पुढच्या आठवड्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. १० ते २० टक्क्यांनी किंमती कमी करण्याचे संकेत मंडळाने दिले आहेत. पण यामुळे विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी इच्छुक, अर्जदारांनी केली आहे.