Mumbai Real Estate / मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सोमवारी दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार दुपारी ३ वाजता सोडतपूर्व प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत १६५ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत.
मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली असून सोमवारपासून मुंबईतील विविध ठिकाणच्या २६४० घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातील घरांचा समावेश आहे. सर्व उत्पन्न गटासाठी या सोडतीत घरे उपलब्ध असली तरी अत्यल्प गटासाठी अत्यंत कमी केवळ १४५ घरे सोडतीत आहेत. सर्वच गटातील घरांच्या किंमती भरमसाठ आहेत. त्यामुळे या घरांना कसा प्रतिसाद मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान सोमवारी दुपारी ३ वाजता नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत ४३० अर्ज भरण्यात आले अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. तर ४३० अर्जदारांपैकी १६५ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सोडतीसाठी पहिल्या दिवशी चार तासांत १६५ अर्ज दाखल झाले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. मुंबईतील सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. २०२३-२०२४ मधील सोडतीलाही अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण या दोन्ही सोडतीतील महागडी घरे विकली गेली नाहीत. त्यामुळे विकल्या न गेलेल्या ११८ घरांचा समावेश मंडळाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत करून या घरांची विक्री करावी लागत आहे.
अशात सोमवारपासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू झालेल्या २६४० घरांच्या सोडतीतील घरेही प्रचंड महाग आहेत. अल्प गटातील घरांच्या किंमती दोन कोटींवर पोहोचल्या असून मध्यम गटातील घरे पाच कोटींपर्यंतची आहेत. त्यामुळे या घरांना कसा प्रतिसाद मिळतो हे सोडतपूर्व प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर ३० एप्रिलनंतर स्पष्ट होईल.
सोडतीचे वेळापत्रक
- अर्ज विक्री-स्वीकृती : ३० मार्चला दुपारी ३ वाजल्यापासून सुरुवात
- अर्जाची अंतिम मुदत : २९ एप्रिल, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत : ३० एप्रिल, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- अर्जाची प्रारूप यादी : ५ मे, सायंकाळी ६ वाजता
- हरकती/दावे : ८ मे
- अंतिम यादी : १२ मे, सायंकाळी ६ वाजता
- सोडत : १५ मे, सकाळी ११ वाजता
| गट | उत्पन्न मर्यादा | उपलब्ध सदनिका |
| अत्यल्प उत्पन्न गट | ६ लाखांपर्यंत | १४५ |
| अल्प उत्पन्न गट | ९ लाखांपर्यंत | ८५८ |
| मध्यम उत्पन्न गट | १२ लाखांपर्यंत | १,४०८ |
| उच्च उत्पन्न गट | १२ लाखांपेक्षा अधिक | २२९ |
आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड आणि पॅनकार्ड (विवाहित असल्यास पती-पत्नी दोघांचे).
- वास्तवाचा दाखला.
- कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला.
- सामाजिक आरक्षणासाठी जातप्रमाणपत्र.
- जात पडताळणी प्रमाणपत्र.
- इतर प्रवर्गासाठी त्या त्या प्रवर्गातील प्रमाणपत्र.
