मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २५०० घरांची सोडत काढण्याची घोषणा नुकतीच केली. या सोडतीसाठी मुंबई मंडळाला म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मुंबई शहरातील १४३ घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. या घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम सध्या मुंबई मंडळाकडून सुरू असून ही घरे भायखळा, लोअर परळ, वडाळा, माझगाव आणि अन्य ठिकाणची आहेत. ४०० चौ. फुटांपासून थेट १३०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा यात समावेश आहे. त्यामुळे दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरांच्या किंमती कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून दुरुस्ती मंडळाला विकासकांकडून अतिरिक्त घरे उपलब्ध होतात. यातील काही घरे बृहतसूचीवरील विजेत्यांना वितरित केली जातात. तर काही घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध करण्यात येतात. दुरुस्ती मंडळाला विकासकांकडून उपलब्ध होणाऱ्या घरांमध्ये मोठ्या क्षेत्रफळाच्या घरांचा समावेश अधिक असतो. अशावेळी बृहतसूचीअंतर्गत मोठ्या घरांसाठीचे लाभार्थी खूपच कमी असतात. त्यामुळे मोठ्या क्षेत्रफळाची घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध करून दिली जातात. त्यानुसार २०२६ च्या आगामी सोडतीसाठी मुंबई मंडळाने दुरुस्ती मंडळाकडे घरांची विचारणा केली होती. ही विचारणा झाल्यानंतर दुरुस्ती मंडळाने घरे शोधून काढली.
अंदाजे १४३ घरे मुंबई मंडळाला देण्याचा निर्णय घेत ती नुकतीच मुंबई मंडळाकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे मुंबई मंडळाच्या २५०० घरांच्या सोडतीत दुरुस्ती मंडळाच्या १४३ घरांचा समावेश असणार असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर या घरांच्या माध्यमातून मुंबई शहरात सोडतीद्वारे घर घेण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे.दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या १४३ घरांपैकी सर्वाधिक घरे ही फॉकलंड रोड येथील आहेत. येथील १०३ घरे सोडतीत समाविष्ट असणार असून या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे ४०० चौ. फुट इतके असणार आहे. ही घरे अत्यल्प गटातील आहेत. या घरांच्या किंमती नेमक्या किती असतील हे लवकरच स्पष्ट होईल.
वडाळ्यातील अंदाजे २० घरेही सोडतीत असणार असून या घरांचे क्षेत्रफळ ४०० ते ७०० चौ. फुटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे ही घरेही अत्यल्प गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतर माझगावमधील काही घरांचाही सोडतीत समावेश असणार असून ही घरे ४०० ते ६५० चौ. फुटांची असणार आहेत. त्याचवेळी उच्च उत्पन्न गटातील ११ घरेही दुरुस्ती मंडळाने मुंबई मंडळाला दिली आहेत. ही घरे ९०० ते १३०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश सोडतीत आहे. शिवडीसह अन्य ठिकाणी ही घरे आहेत. दुरुस्ती मंडळाकडून उपलब्ध झालेल्या घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम मुंबई मंडळाकडून सुरू आहे. ही घरे मुंबई शहरात असल्याने आणि ती दुरुस्ती मंडळाकडून उपलब्ध झाली असल्याने त्यांच्या किंमती कोटींच्या घरात असणार आहेत. कारण या घरांच्या किंमती निश्चित करण्याचे धोरण वेगळे असल्याने त्यांच्या किंमती अधिक असण्याची शक्यता आहे.
