मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकांतर्गत उपलब्ध झालेल्या चार भूखंडांवर २३४३ घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या घरांच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून या निर्माणाधीन घरांचा समावेश आगामी सोडतीत करण्याचा निर्णय मंडळाने यापूर्वी घेतला होता. या घरांसाठी विजेत्यांकडून पाच टप्प्यांत घराची रक्कम भरून घेऊन, काम पूर्ण झाल्यानंतर ताबा देण्याची योजना होती. मात्र, आता आगामी सोडतीतून ही घरे वगळण्यात आली आहेत.
घरांचे काम पूर्ण होण्यासाठी चार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याने, या घरांचा समावेश सोडतीत न करता एका वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणाऱ्या घरांसाठीच सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे पत्राचाळीतील २३४३ घरांच्या सोडतीसाठी इच्छुकांना पुढील सोडतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला आहे. पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण झाल्यानंतर मंडळाने विक्री घटकांतर्गत उपलब्ध भूखंडांचा विकास करून पुनर्विकासाचा खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार भूखंडांवर २३४३ घरे बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आणि त्या अंतिम करून कंत्राटे बहाल करण्यात आली. दोन भूखंडांचे कंत्राट बी. जी. शिर्के कंपनीला, एका प्रकल्पाचे काम देव इंजिनीयर्सला, तर एका भूखंडावरील घरांचे काम वसंत विहार रिॲल्टी कंपनीला देण्यात आले. या २३४३ घरांच्या कामाला यापूर्वीच सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र काही परवानग्या व इतर कारणांमुळे कामास विलंब झाला. आता या घरांच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
दरम्यान, पत्राचाळीतील या घरांसाठी २०२६ मध्येच सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता आणि तसे जाहीरही केले होते. घरे पूर्ण होण्यासाठी चार वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागणार आहेत. असे असताना पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने आणि घरांची संख्या वाढवण्यासाठी मंडळ पत्राचाळीतील घरे सोडतीत समाविष्ट करण्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे २०२६ च्या आगामी सोडतीत २३४३ घरे विक्रीसाठी समाविष्ट करण्याची तयारी सुरू होती. या घरांसाठी कामाच्या टप्प्यानुसार विक्री किमतीची रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करून घेण्याची योजना होती. मात्र, आता ही घरे आगामी सोडतीतून वगळण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
म्हाडाच्या सोडतीत विजेत्यांना शक्य तितक्या लवकर घरांचा ताबा देणे आवश्यक असल्याने, वर्षभरात पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकणारी घरेच सोडतीत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोरीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या वर्षी पत्राचाळीतील २३४३ घरांसाठी सोडत निघणार नाही. ही घरे पूर्ण होण्यासाठी किमान चार वर्षे लागतील, असेही त्यांनी सांगितले. आगामी सोडतीसाठी अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असून, सोडतीत किती घरे असतील आणि जाहिरात केव्हा प्रसिद्ध केली जाईल, याबाबतची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही बोरीकर यांनी नमूद केले. यामुळे पत्राचाळीतील ४० मजली इमारतींमधील अल्प, मध्यम आणि उच्च गटातील घरे खरेदी करू इच्छिणाऱ्यांना पुढील सोडतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
