मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांसाठी गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत पार पडली. या सोडतीसाठी ७५ हजार १२७ अर्ज सादर झाले होते. मध्यम आणि उच्च गटातील महागड्या घरांना प्रतिसाद कमी मिळाला होता. ३०४ घरांसाठी शून्य प्रतिसाद मिळाला होता. मात्र तरीही प्रत्यक्षात सोडतीत २६४० घरांपैकी केवळ सात घरे शिल्लक राहिली. एकूण घरांपैकी ९९ टक्के घरांची विक्री झाली. प्रतिसाद न मिळालेली महागडी घरे सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी (सामाजिक आरक्षण वगळता) वळविण्यात आली. त्यामुळे यावेळी घरे प्रचंड महाग असतानाही सोडतीत केवळ सातच घरे शिल्लक राहिली.
मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीतील घरे प्रचंड महाग असल्याने म्हाडावर टीका झाली. परिणामी, सोडत प्रक्रिया सुरू असतानाच विक्रोळीतील घरांच्या किंमती साडेसात टक्क्यांनी कमी करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली. किंमती कमी करूनही घरांना प्रतिसाद मिळाला नाही. २६४० पैकी ३०४ घरांसाठी एकही अर्ज सादर झाला नव्हता. ३०४ घरांपैकी २२५ घरे उच्च उत्पन्न गटातील, तर ३३ घरे मध्यम गटातील आणि ३० घरे अल्प, तर ७ घरे अत्यल्प गटातील होती. ३०४ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला असला तरी प्रत्यक्षात सोडतीत मात्र केवळ सात घरे शिल्लक राहिल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
३०४ घरांना प्रतिसाद मिळाला नसला तरी शून्य प्रतिसाद मिळालेल्या घरांपैकी २९८ घरे सामाजिक आरक्षण वगळता इतर प्रवर्गातील आरक्षित घरे होती. नियमानुसार सामाजिक आरक्षण वगळता इतर प्रवर्गातील घरे सोडत काढताना सर्वसाधारण गटात वळवता येतात. त्यानुसार गुरुवारी २९८ घरे सर्वसाधारण गटात वळवून त्यांची सोडत काढण्यात आली. त्यामुळे शून्य प्रतिसाद मिळालेली २९८ घरेही विकली गेली आणि केवळ ७ घरे रिक्त राहिली.
उपलब्ध माहितीनुसार, चालू बांधकाम प्रकल्पातील आणि ३३ (५) योजनेअंतर्गत मिळालेली सर्व घरे विकली गेली. ३३ (७) योजनेअंतर्गत मिळालेली दोन आणि विखुरलेल्या घरांच्या योजनेतील ५ घरांची विक्री झालेली नाही. माटुंगा येथील आनंद हाइट्समधील ४९ घरे विक्रीसाठी होती. त्यानुसार या घरांसाठी ४७ अर्ज आल्याने दोन घरे विक्रीवाचून रिक्त राहिली. तर भायखळा येथील आरडी प्रॉपर्टीजमधील ४ घरांसाठी ३ अर्ज आल्याने १ घर रिक्त राहिले. वडाळ्यातील आनंद हाइट्समधील ७ घरांसाठी ६ अर्ज आल्याने १ घर रिक्त राहिले. वडाळ्यातील एका घरासाठी शून्य अर्ज आल्याने हे एक घरही रिक्त राहिले आहे. तसेच वडाळा, नाडकर्णी पार्क येथील एका घरासाठी शून्य अर्ज आल्याने हे घरही रिक्त राहिले. रिक्त राहिलेली ही सातही घरे सामाजिक आरक्षणातील आहेत. ही घरे आता आगामी सोडतीत समाविष्ट केली जातील.
मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीतील घरे महाग असल्याची टीका होत असतानाही प्रत्यक्षात ९९.७३ टक्के घरे विकली गेली असून केवळ सातच घरे शिल्लक राहिली. यापूर्वीच्या सोडतीत ही संख्या प्रचंड होती. त्यामुळे मुंबई मंडळासाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र आता २६३३ विजेत्यांपैकी प्रत्यक्षात किती विजेते घरे स्वीकारतात, किती परत करतात, हे अंतिम झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने किती घरे विकली गेली, हे स्पष्ट होईल.
