मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांसाठी अनामत रक्कमेसह ७५ हजार ६७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार अर्जांची छाननी करून मंडळाने बुधवारी अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार ७५ हजार ३५८ अर्ज प्राप्त ठरले असून ३१६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या यादीनुसार विक्रीवाचून रिक्त राहिलेल्या, शहरभर विखुरलेल्या ३१९ घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या घरांसाठी तब्बल ३६ हजार ३७० अर्ज जमा झाले असून एका घरामागे ११४ अर्ज आहेत. त्याचवेळी मुंबई मंडळाच्या विक्रोळी, कन्नमवार नगरमधील चालू बांधकाम प्रकल्पातील घरांकडे इच्छुकांनी, अर्जदारांनी पाठ फिरवली आहे.
घरांच्या किंमती अधिक असल्याने या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. घरांच्या किंमती कमी केल्यानंतरही १७६२ घरांसाठी केवळ १३ हजार १६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. एका घरामागे केवळ ७ अर्ज या घरांसाठी आले आहेत. त्यामुळे अर्जदारांनी परवडणाऱ्या घरांना पसंती दिली असून महागडी घरे नाकारल्याचे अधोरेखित झाले आहे.
प्रतिसादाअभावी सोडतपूर्व प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या २६४० घरांसाठी ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सोडतपूर्व प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली. विक्रोळी, कन्नमवार नगरमधील घरांच्या किंमती साडेसात टक्क्यांनी कमी केल्या. मध्यम गटातील काही घरे अचानक सोडतपूर्व प्रक्रिया सुरू असतानाच उच्च उत्पन्न गटात समाविष्ट केली. इतके करूनही विक्रोळी, कन्नमवार नगरमधील चालू बांधकाम प्रकल्पातील घरांना प्रतिसाद मिळालेला नाही.
मुंबई मंडळाने २६४० घरांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप यादी बुधवारी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार ७५ हजार ३५८ अर्ज मिळाले असून ३१६ अर्ज अपात्र ठरले आहेत. अपात्र अर्जदारांच्या सूचना-हरकतींचा विचार करून लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर सोडतीत किती अर्जदार सहभागी होणार हे निश्चित होईल. दरम्यान, प्रारूप यादीनुसार अर्जदारांनी महागड्या घरांना नकार दिला असून परवडणाऱ्या घरांवरच अर्जदारांच्या उड्या पडल्या आहेत. सोडतीत चालू बांधकाम प्रकल्पातील १७६२ घरांचा समावेश होता. मात्र या घरांसाठी केवळ १३ हजार १६२ अर्ज आले आहेत. एका घरामागे केवळ ७ अर्ज जमा झाले असून हा सर्वात कमी प्रतिसाद आहे.
३३(७) मधील घरांना कमी प्रतिसाद
चालू बांधकाम प्रकल्पातील घरांना प्रतिसाद मिळाला नसला तरी विखुरलेल्या घरांना, त्यातही यातील परवडणाऱ्या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विखुरलेल्या ३१९ घरांसाठी ३६ हजार ३७० अर्ज प्राप्त झाले आहेत. एका घरामागे ११४ इतके अर्ज आहेत. तर ३३(५) अंतर्गत सोडतीत समाविष्ट असलेल्या घरांनाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. ही घरेही महागडी असल्याने या घरांनाही कमी प्रतिसाद मिळाला आहे.
३३(५) योजनेतील सोडतीत ३७१ घरे समाविष्ट असताना या घरांसाठी केवळ २३ हजार ५९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. एका घरामागे ६३ असे हे अर्ज आहेत. तर ३३(७) योजनेतील १८८ घरे सोडतीत समाविष्ट असून या घरांकडे अर्जदारांनी, इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कारण १८८ घरांसाठी केवळ २ हजार २२९ अर्ज प्राप्त झाले असून एका घरामागे ११ अर्ज अशी अर्जांची संख्या आहे. संकेत क्रमांकानुसार कोणत्या घरांना किती प्रतिसाद मिळाला आहे, याची माहिती मुंबई मंडळाकडून उपलब्ध झाली नाही. मात्र एक कोटींपेक्षा अधिक किंमतींच्या घरांना प्रतिसादच मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
