मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीतील तब्बल ९५९ घरे विजेत्यांनी मंडळाला परत (सरेंडर) केली आहेत. परत करण्यात आलेल्या घरांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाईल, असे म्हणत मंडळाने या सोडतीतील घरे शिल्लक राहणार नसल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात सोडतीत एकाच, चालू बांधकाम प्रकल्पातील ४०० हून अधिक घरे शिल्लक राहण्याची शक्यता आहे. कारण चालू बांधकाम प्रकल्पातील १७६२ घरांपैकी तब्बल ६७० विजेत्यांनी घरे परत केली असताना १७६२ घरांसाठी केवळ २५९विजेत्यांची प्रतीक्षा यादी आहे. त्यातच प्रतीक्षा यादीवरील हे विजेते कोणत्या घरांसाठी आहेत, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुरेशी प्रतीक्षा यादी नसल्याने चालू बांधकाम प्रकल्पातील ४०० हून अधिक घरे शिल्लक राहणार आहेत. यावरून चालू बांधकाम प्रकल्पातील घरांना अर्जदारांनी, विजेत्यांनी आणि इच्छुकांनी नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे.
मुंबईतील विविध ठिकाणच्या २६४० घरांसाठी ६ ऑगस्टला सोडत काढण्यात आली. या सोडतीत ७५ हजारांहून अधिक अर्जदार सहभागी झाले होते. मात्र यातील २६०० हून अधिक अर्जदार विजेते ठरले. या विजेत्यांना नुकतेच मंडळाकडून स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. त्यानुसार स्वीकृती पत्र सादर करण्याच्या विहित मुदतीत ९५९ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत. चालू बांधकाम प्रकल्पातील १७६२ विजेत्यांपैकी ६७० विजेत्यांनी, ३३(५) योजनेतील ३७१ विजेत्यांपैकी ४८ विजेत्यांनी, ३३ (७) योजनेतील १८८ विजेत्यांपैकी ११२ विजेत्यांनी, तर विखुरलेल्या घरांच्या योजनेतील ३१९ विजेत्यांपैकी १२९ विजेत्यांनी घरे परत केली आहेत. मोठ्या संख्येने घरे परत झाल्याने म्हाडाची चिंता वाढली आहे. मात्र त्याचवेळी या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाणार असल्याने विक्रीवाचून कमी घरे शिल्लक राहतील, असा दावा केला जात आहे. मात्र हा दावा साफ खोटा ठरण्याची शक्यता आहे. कारण उपलब्ध माहितीनुसार चालू बांधकाम प्रकल्प योजनेतील १७६२ विजेत्यांपैकी ६७० विजेत्यांनी घरे परत केली असताना या योजनेतील प्रतीक्षा यादीवर केवळ २५९ विजेते आहेत. त्यातही कोणत्या प्रवर्गातील विजेत्यांनी घरे परत केली आणि कोणत्या प्रवर्गासाठी पुरेशी प्रतीक्षा यादी नाही, हे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांची स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल. मात्र चालू बांधकाम प्रकल्पातील मोठ्या संख्येने विजेत्यांनी घरे परत केल्याने आणि त्या तुलनेत प्रतीक्षा यादीवर अत्यंत कमी विजेते असल्याने ४०० हून अधिक घरे शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चालू बांधकाम प्रकल्पातील ४०० हून अधिक घरे विक्रीवाचून शिल्लक राहण्याची शक्यता असतानाच ही संख्या आणखी फुगण्याची शक्यता आहे. कारण ३३(५), ३३(७) आणि विखुरलेल्या घरांच्या योजनेतील घरे ही मोठ्या संख्येने परत झाली असून या योजनेतील घरांसाठीही प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांची संख्या अपेक्षित संख्येइतकी नाही. त्यामुळे सोडतीत यंदा मोठ्या संख्येने घरे शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नेमकी किती घरे शिल्लक राहतात, हे ताबा देण्याची प्रक्रिया १०० टक्के पूर्ण झाल्यानंतरच समजेल. मात्र चालू बांधकाम प्रकल्पातील घरांसह म्हाडाची घरे महागडी असल्याने इच्छुकांनी, अर्जदारांनी आणि विजेत्यांनी नाकारल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
शिल्लक घरे पुढील सोडतीत
मोठ्या संख्येने घरे परत करण्यात आल्याने तसेच पुरेशी प्रतीक्षा यादी नसल्याने यावेळी मोठ्या संख्येने घरे शिल्लक राहणार असल्याबद्दल मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी घरे परत झाली असून चालू बांधकाम प्रकल्पातील घरांसाठी पुरेशी प्रतीक्षा यादी नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र जी काही घरे या सोडतीत विकली जाणार नाहीत, त्या घरांचा समावेश आगामी सोडतीत केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
