मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या पत्राचाळ योजनेतील ३०६ विजेत्यांना मागील आठ वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. मात्र, घरे ताब्यात येण्याआधीच त्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाने या योजनेतील घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून अत्यल्प गटातील घरांच्या किमतीत सात लाखाने तर मध्यम गटातील घराच्या किमतीत दहा लाखांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

घरांच्या किमतीत वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास नवीन किमती जाहीर केल्या जातील. ही वाढ झाल्यास ३०६ विजेत्यांवरील आर्थिक भार वाढणार असून याला विरोध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…मुंबई : ग्रीनलाइट लेझर शस्त्रक्रियेने ७० वर्षांच्या वृद्धाला मिळाले नवजीवन!

गोरेगाव पश्चिम येथील वादग्रस्त सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळीतील म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचे काम विकासकाने सुरू केले होते. मात्र, या घरांचे काम अपूर्णच होते आणि प्रकल्प वादात अडकला होता. असे असताना तत्कालीन उपाध्यक्षांनी ही घरे २०१६ च्या सोडतीत समाविष्ट केली. अनेक अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही घरांसाठी सोडत काढण्यात आली. दरम्यान, २०१८ मध्ये राज्य सरकारने पत्राचाळ प्रकल्प म्हाडाकडे वर्ग केला. त्यानंतर २०२२ मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुनर्वसित इमारतीसह सोडतीतील ३०६ घरांचा समावेश असलेल्या इमारतीच्या कामास सुरुवात केली.

सोडतीतील घरांच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून सध्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्याने आता लवरकरच घराचा ताबा मिळेल, अशी आशा ३०६ विजेत्यांना आहे. एकीकडे घरे ताब्यात मिळण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी त्यांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे. मुंबई मंडळाने पत्राचाळ योजना सोडतीतील ३०६ घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली आहे. तर मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा…मुंबई : अकरावीसाठी वाणिज्य शाखेला पसंती, प्रवेशाची सर्वसाधारण यादी जाहीर; ९० टक्क्यांवरील १७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

मंडळाच्या २०१६ च्या सोडतीत अत्यल्प गट-१ मध्ये १७४ घरांचा समावेश असून या घरांच्या किमती ३० लाख १६ हजार रुपये अशा आहेत. तर अत्यल्प गट-२ मध्ये ४६ घरे असून त्यांच्या किमती ३० लाख ४१ हजार रुपये अशा आहेत. मध्यम गटातील ८६ घरांसाठी ४४ लाख ३९ हजार अशी किंमत निश्चित करण्यात आली होती. आता मात्र या किमतीत भरमसाठ वाढ होईल.

‘खर्च वसुली गरजेची’

ही घरे सोडतीत समाविष्ट करण्यात आली, तेव्हा विकासकाकडून एक ते दीड वर्षात घरांचे काम पूर्ण केले जाणार होते. त्यानुसार त्यावेळी घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या होत्या. आता घरांचे काम मुंबई मंडळाने पूर्ण केले असून यासाठी बराच खर्च आला. २०२४ मध्ये घरांचे वितरण होणार असल्याने घरांच्या किमतीत वाढ करणे अपरिहार्य झाले आहे. बांधकामासाठी आलेला खर्च वसूल करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने घरांच्या किमतीत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई : भरधाव मोटारीच्या धडकेत तिघे जखमी, पोलिसांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न; खार लिकिंग रोड येथील घटना

‘हा तर अन्याय’

आम्ही २०१६ पासून घराच्या प्रतीक्षेत आहोत. अद्याप घराचा ताबा दिलेला नाही आणि आता थेट घरांच्या किमतीत सात ते दहा लाखांची वाढ प्रस्तावित केली आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. आठ वर्षे म्हाडाने विलंब केला आहे आणि आता आमच्यावर आर्थिक भार टाकला जात आहे. ही दरवाढ आम्हाला मान्य नसून आमचा याला विरोध असेल अशी माहिती एका विजेत्याने दिली.