मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही पुनर्विकास प्रकल्पांना राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता लवकरच या तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा मागवून पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे.
म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास स्वतः मार्गी लावण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार काळाचौकीतील अभ्युदय नगर, वरळीतील आदर्श नगर, वांद्रे पश्चिम येथील वांद्रे रेक्लमेशन आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर यांचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास हाती घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या चारही पुनर्विकास प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. राज्य सरकारने या प्रकल्पांना २०२५ मध्ये मान्यता दिली. अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून आता केवळ निविदा अंतिम होणे बाकी आहे. त्यानंतर या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
त्याचबरोबर वांद्रे रेक्लमेशन, आदर्श नगर आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर पुनर्विकासाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांना राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर उच्चस्तरीय समितीनेही मंजुरी दिल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. तिन्ही पुनर्विकास प्रकल्पांना उच्चस्तरीय समितीची मान्यता मिळाल्याने लवकरच तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. निविदा प्रक्रिया मार्गी लागल्याने आता या तिन्ही प्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आदर्श नगर पुनर्विकासाअंतर्गत ३,४१० रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांना ८०० ते २,५०० चौ.फुटांची घरे दिली जाणार आहेत. वांद्रे रेक्लमेशन पुनर्विकासाअंतर्गत तेथील रहिवाशांना १,००० ते २,५०० चौ.फुटांची घरे दिली जाणार आहेत. या दोन्ही पुनर्विकास प्रकल्पांतून म्हाडाला एकूण १ लाख १४ हजार ८२२ चौ.मीटर क्षेत्र विक्री घटक म्हणून उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करून ही घरे सोडतीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
तसेच या दोन्ही प्रकल्पांतून मुंबई मंडळाला ४,९४६ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर पुनर्विकासाअंतर्गत ४,६७१ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून या प्रकल्पातूनही मुंबई मंडळाला सोडतीसाठी घरे उपलब्ध होणार आहेत.

