मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारितील ४८ दुकाने विक्रीविना धूळ खात पडून असून या दुकानांच्या विक्रीतून मिळणारा निधीही अडकून पडला आहे. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. जून-जुलैमध्ये यासाठी जाहिरात काढण्याची शक्यता होती. मात्र, ही विक्री लांबणीवर पडली. आता या दुकानांची विक्री करण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली तयार करणार असून दिवाळीनंतर जाहिरात प्रसिद्ध करून दुकानांची विक्री करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता लवकरच इच्छुकांना मुंबईत ई-लिलावाशिवाय दुकान खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
म्हाडाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकानेही बांधण्यात येतात. त्या दुकानांची विक्री लिलाव पद्धतीने केली जाते. दुकानांसाठी मंडळाकडून निश्चित असे बोली दर ठरविले जातात. इच्छुकांकडून अर्ज मागविले जातात आणि मंडळाच्या बोलीदरापेक्षा सर्वाधिक दर देणाऱ्याला दुकान वितरित केले जाते. त्यानुसार आतापर्यंत मुंबई मंडळाने मोठ्या संख्येने दुकानांची विक्री केली.
मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून मुंबईतील दुकानांना प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. दोनपेक्षा अधिक वेळा ई-लिलाव करूनही दुकाने विकली जात नसल्याने मंडळाची चिंता वाढली आहे. दुकाने विकली जात नसल्याने पैसे अडकून राहत आहेत. त्यामुळे रिक्त घरांप्रमाणेच आता दुकानांचीही ‘प्रथम प्राधान्या’अंतर्गत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रस्तावाला मान्यता
मालाड, मालवणी, बिंबिसार नगर, चुनाभट्टी, शीव आदी ठिकाणच्या विक्रीविना रिक्त असलेल्या ४९ दुकानांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठविण्यात आलेल्या त्यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. दरम्यान, जून-जुलैमध्ये यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून विक्री प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता होती. मात्र, ही प्रक्रिया लांबणीवर पडली असून अजूनही दुकानांच्या विक्रीची प्रतीक्षाच आहे.
अनामत रक्कम न भरल्यास दुसऱ्या अर्जदाराला संधी
रिक्त ४९ दुकानांची ‘प्रथम प्राधान्या’अंतर्गत विक्री करण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणालीची गरज आहे. प्रणाली तयार झाल्यानंतर तिची चाचणी करून त्यानंतर सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर इच्छुकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करून सर्वात आधी जो अनामत रकमेसह अर्ज सादर करेल, त्याला दुकानाचे वितरण केले जाईल. मात्र, यासाठी संबंधित अर्जदारांनी निश्चित वेळेत दुकानाच्या विक्री किमतीतील ठरावीक रक्कम मंडळाकडे भरणे आवश्यक असेल. अन्यथा, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील अर्जदाराला संधी दिली जाईल. त्यामुळे मंडळाच्या या दुकानांच्या विक्रीअंतर्गत इच्छुकांना ई-लिलावाशिवाय मुंबईत दुकान खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
