मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीत रिक्त राहिलेल्या अंदाजे १२५ घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईत घर घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांना विविध कागदपत्रे जमा करून सादर करण्याची गरज नाही.

या योजनेनुसार केवळ आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे नोंदणी करून ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरासाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. मात्र त्याचवेळी या योजनेतील काही घरे सामाजिक आरक्षणाअंतर्गत राखीव असणार आहेत. मात्र या घरांसाठी जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

ताडदेव, वडाळा, तुंगा पवई आणि अन्य काही ठिकाणची म्हाडाची महागडी घरे दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेलेली नाहीत. त्यामुळे मुंबई मंडळाचे आर्थिक नुकसान होत असून घरे धूळ खात पडून आहेत, त्याच्या देखभालीचाही भार मुंबई मंडळावर पडत आहे. या पार्श्वभूमीवर नियमानुसार दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विक्रीवाचून रिक्त राहिलेली घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विकण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई मंडळाकडून सुरू आहे.

मुंबई मंडळाच्या पणन विभागाने अशी अंदाजे १२५ घरे शोधून काढली आहेत. यातील बहुतांश घरे मध्यम आणि उच्च गटातील आहेत. या घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. किंमती निश्चित झाल्यानंतर जाहिरात काढून या घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’अंतर्गत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

‘प्रथम प्राधान्य’ योजनेत म्हाडा सोडतीच्या अनेक महत्त्वाच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे ज्या महानगरपालिका क्षेत्रात, राज्यात वा भारतात कुठेही इच्छुक अर्जदाराचे हक्काचे, सरकारी योजनेतील घर असले तरी त्याला ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घर घेता येणार आहे. तर उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, प्राप्तीकरण विवरण पत्र, निवासाचा दाखला यासह अन्य काही कागदपत्रांची गरज असते. पण आता मात्र ‘प्रथम प्राधान्य’साठी इच्छुक अर्जदारास केवळ आधारकार्ड आणि पॅनकार्डच सादर करावे लागणार आहे. तर सामाजिक आरक्षणातील घरासाठी आधारकार्ड, पॅनकार्डसह जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.