scorecardresearch

१३ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात; पत्राचाळीत आनंदाचे वातावरण; वेध हक्काच्या घराचे

रूआशीष विकासकाने पुनर्विकासात फसवणूक केल्याने २००८ पासून ६७२ मूळ रहिवासी बेघर झाले आहेत.

मुंबई : पुनर्विकास रखडल्यामुळे गोरेगावच्या पत्राचाळीतील ६७२ रहिवाशांनी काही वर्षांपूर्वी काळी दिवाळीह्ण साजरी केली होती. त्याच पत्राचाळीत आज मात्र आनंदाचे वातावरण आहे. १३ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपल्याने पत्राचाळवासीय आनंदी झाले.

गुरूआशीष विकासकाने पुनर्विकासात फसवणूक केल्याने २००८ पासून ६७२ मूळ रहिवासी बेघर झाले आहेत. गेली १३ वर्षे ते भाडय़ाच्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांना स्वत:च्या खिशातून घरभाडे भरावे लागत आहे. अनेकांना कर्ज काढून भाडे भरावे लागत आहे. या रहिवाशांनी एकत्र येऊन लढा दिला आणि तो यशस्वी झाला. म्हाडाच्या मुंबई मंडळाने पत्राचाळीचा प्रकल्प आपल्या हाती घेतला आणि आता हा प्रकल्प मार्गीही लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अपूर्ण पुनर्वसित इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली. १३ वर्षांचा वनवास संपला अशी भावना रहिवाशांची होती.

हा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सरकारने सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार जूनमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी देण्यात आली. त्यानंतर मुंबई मंडळाने पुनर्वसित इमारतीच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेडला कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी या पुनर्विकासाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

म्हाडाविजेत्यांनाही दिलासा

प्राथमिक माहितीनुसार, ११ मजली आठ (१६ विंगसह) पुनर्वसन इमारतीचे आतापर्यंत केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ६० टक्के काम पूर्ण करून रहिवाशांना घरांचा ताबा देण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. या प्रकल्पात म्हाडाचा हिस्सा असून म्हाडाला विक्रीसाठी २७०० घरे मिळणार आहेत. या घरांचेही काम अपूर्ण असून या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे २७०० मधील ३५६ घरांसाठी मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली असून सोडतीतील विजेते घराच्या प्रतीक्षेत आहेत.

गेली १३ वर्षे आम्ही बेघर आहोत. हक्काचे घर मिळेल की नाही या प्रश्नाने सर्व रहिवासी चिंतित होते. हक्काच्या घरासाठी आम्ही लढलो आणि आम्हाला यश मिळाले. आज आमच्या घराच्या बांधकामाला सुरुवात होत आहे. मात्र, त्याच वेळी म्हाडा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची खंत आहे. प्रकल्पासंबंधीच्या अनेक बाबी आम्हाला सांगितल्या जात नाहीत. आता आम्हाला भाडे देणार का? दिले तर किती देणार हे अजूनही म्हाडाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आता एकच इच्छा आहे की म्हाडाने प्रकल्प वेगाने पूर्ण करावा आणि तो पूर्ण करताना आम्हाला विश्वासात घ्यावे. 

– परेश चव्हाण, रहिवासी

विकासकाने आमची घोर फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर सगळय़ांच्याच पायाखालची जमीन सरकली होती. पण हार न मानता आम्ही हक्काच्या घरासाठी लढायचे ठरवले. त्यासाठी सर्व रहिवासी एकत्र आले आणि व्यापक असा लढा उभारला. एकदा तर काळी दिवाळीही साजरी केली. अगदी निकराने हा लढा लढलो आणि अखेर आज लढा यशस्वी झाला. आता लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा हीच अपेक्षा आहे.

-मकरंद परब, सचिव, गोरेगाव सिद्धार्थनगर गृहनिर्माण संस्था मर्यादित

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mhada mumbai took over patrawala chawl redevelopment project zws