४२३ पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई…नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पाच पुनर्वसित इमारतींचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र केवळ चावीवाटपाच्या कार्यक्रमासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाला मुहूर्त मिळत नसल्याने ८६४ घरांचा ताबा मागील काही महिन्यांपासून रखडला होता. पण आता मात्र चावीवाटपासाठी मुहूर्त मिळाला आहे.

सोमवारी (१६ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात १२ रहिवाशांना चावीवाटप केले जाणार आहे. त्यानंतर ८६४ रहिवाशांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आता ८६४ रहिवासी लवकरच ५०० चौ. फुटाच्या घरात वास्तव्यास जाणार आहेत. तर यातील ४२३ पोलिसांचे १५ लाखांत ५०० चौ. फुटांच्या हक्काच्या घराचेही स्वप्न यावेळी पूर्ण होणार आहे।

ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत सध्या पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरू असून २०२९ पर्यंत तिन्ही चाळीतील सर्व रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे आहे. दरम्यान जसजशा पुनर्वसित इमारती पूर्ण होत आहेत, तसतसा घरांचा ताबा दिला जात आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी वरळीतील ५५६ रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला आहे. तर आता नायगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ घरांचे काम पूर्ण झाले असून या घरांना निवासी दाखलाही मिळाला आहे.

निवासी दाखला मिळून तीन-चार महिने उलटले तरी घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया खोळंबली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीवाटप करायचा निर्णय म्हाडाने घेतला, मात्र यासाठी वेळच मिळत नसल्याने चावीवाटप रखडले होते. पण आता मात्र मुख्यमंत्र्यांनी सोमवारची वेळ दिली आणि चावीवाटपाचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे चावीवाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे।

नायगावमधील ८६४ घरांसाठी जे रहिवासी पात्र ठरले आहेत, त्यात ४२३ पोलीस कुटुंबांचा समावेश आहे. राज्य सरकारने बीडीडीतील सेवानिवृत्त तसेच सध्या सेवेत असलेल्या २३५० पोलिसांना १५ लाखांत बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नायगावमधील ४२३ पोलीस कुटुंबे सर्वप्रथम या निर्णयाचा लाभ घेणारी पोलीस कुटुंबे ठरणार आहेत. ४२३ पोलिसांकडून १५ लाख रुपये भरण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत मोठ्या संख्येने पोलिसांनी रक्कम अदा केली आहे. सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात काही पोलिसांना चाव्या वितरित केल्या जाणार आहेत. तर ८६४ घरांच्या हक्काच्या घरांचा ताबा मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. दरम्यान, या चावीवाटप कार्यक्रमाचे म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial या यूट्यूब तसेच फेसबुक चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तर प्रकल्पस्थळी पुनर्वसित इमारत क्रमांक टी ६ आणि टी ७ च्या आवारात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात ५०० रहिवाशांची बसण्याची सोय करण्यात आली असून येथे त्यांना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. …………………