मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील रिक्त घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने अंदाजे १२५ घरांचा शोध घेत डिसेंबरमध्ये घरांच्या विक्रीस सुरुवात होईल, असे जाहीर केले होते. मात्र ही योजना अद्याप सुरु झालेली नसून सोडतीशिवाय मुंबईत आपल्या इच्छेने म्हाडाचे घर घेण्याची इच्छुकांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.

सर्वसामान्यांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्याच्या उद्दिष्टाने म्हाडाची स्थापना झाली आहे. त्यानुसार मुंबई मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत सोडतीद्वारे हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. म्हाडाच्या घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. म्हाडाची मुंबईतील घरे विक्रीवाचून रिक्त राहत नाहीत. पण मागील दोन-तीन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. सोडतीत दीड कोटींपासून ते साडे सात कोटींपर्यंतच्या घरांचा समावेश होत आहे. ही घरे महागडी असल्याचे सांगत इच्छुकांनी घरांकडे पाठ फिरवली. त्यामुळेच ताडदेव, तुंगा पवई, जुहू, अंधेरी अशा ठिकाणची घरे दोन ते तीनदा सोडतीत विकली गेली नाहीत.

ही सोडतीत विकली जात नसल्याने अखेर मंडळाने नियमाप्रमाणे या घरांची विक्री अखेर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वाने करण्याचा निर्णय घेतला. याला म्हाडा उपाध्यक्षांनी हिरवा कंदिल दिला. त्यानंतर मंडळाने अशा घरांची शोधाशोध करत अंदाजे १२५ घरे निश्चित केली. या घरांच्या विक्रीला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरुवात करण्याचे निश्चित केले. मात्र तांत्रिक अडचणी आणि संथ कारभारामुळे ही योजना रखडली. त्यानंतर पालिकेची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यानंतर प्रथम प्राधान्यअंतर्गत घरांची विक्री सुरु होईल, असे वाटत होते, मात्र अद्यापही ही योजना सुरु झालेली नाही. सोडतीशिवाय मुंबईत घर घेण्याचे इच्छुकांचे स्वप्न लांबणीवर पडत आहे.

अंदाजे १२५ घरांपैकी काही घरांच्या किंमती निश्चित झाल्या आहेत. तर ४ ते ५योजनेतील घरांच्या किंमती निश्चित होणे शिल्लक आहे. त्यामुळे प्रथम प्राधान्य योजनेस सुरुवात करण्यास विलंब होत असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काही घरांच्या किंमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरु आहे. हे काम पूर्ण करत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांच्या विक्रीस सुरुवात होईल, अशी माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. त्यामुळे सोडतीशिवाय म्हाडाचे घर खरेदी करण्याची संधी मुंबईकरांना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ना उत्पन्न मर्यादा ना अटी ना भरमसाठ कागदपत्रे

म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना आयकर विवरण पत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रासह अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार अर्जदारांचा गट निश्चित केला जातो आणि संबंधित अर्जदार त्याच गटातील घरासाठी अर्ज करु शकतो. तर इतर अनेक अटीला लागू असतात. महत्त्वाचे म्हणजे सोडतीद्वारेच घरांचे वितरण केले जात असल्याने ज्याचे सोडतीत नाव येईल त्याचेच घराचे स्वप्न पूर्ण होते, पण प्रथम प्राधान्यमध्ये कोणत्याही अटी नाहीत. सोडत नाही, भरमसाठ कागदपत्रांची गरज नाही. उत्पन्न मर्यादा नाही, आयकर विवरण पत्राची गरज नाही. फक्त आधारकार्ड आणि पॅनकार्डवर घर घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. मात्र सामाजिक आरक्षणातील घर असल्यास जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. तर बुक माय शो प्रमाणे बुक माय होम संकल्पनेनुसार हवे ते घर खरेदी करता येणार आहे. मात्र प्रथम जो ज्या घरासाठी अर्ज करून अनामत रक्कम आणि त्यानंतर घराची रक्कम भरेल त्याला ते घर मिळणार आहे. त्यामुळे आपल्या हव्या त्या घरासाठी सर्वात आधी अर्ज भरणे आवश्यक असणार आहे.