मुंबई : विविध कारणांमुळे तीन वेळा लांबणीवर गेलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची ४१८६ घरांची सोडत आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आता सोडत अडकली आहे. आचारसंहितेत सोडत काढता येईल का यादृष्टीने निवडणूक आयोगाकडे पुणे मंडळाचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र आचारसंहितेत सोडत काढली जाण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, आचारसंहितेनंतरच सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन लाख १५ हजारांहून अधिक अर्जदारांना आता आणखी महिनाभर सोडतीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

पुणे मंडळाने २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत पुणे मंडळाच्या पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या ४१८६ घरांसाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सोडतीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सोडत तीन वेळा लांबणीवर पडली. नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपली आणि या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ४१८६ घरांसाठी दोन लाख १५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. मात्र अर्जांची छाननी पूर्ण न झाल्याने पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत सोडत काढणे पुणे मंडळाला शक्य झाले नाही. त्यामुळे तीन वेळा लांबणीवर गेलेली सोडत आता आचारसंहितेमुळे अडकली आहे.

परिणामी, दोन लाख १५ हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा लांबली. सप्टेंबरपासून अर्जदारांनी अनामत रक्कम पुणे मंडळाकडे जमा केली. ही रक्कम अडकून राहिल्याने अर्जदारांची आर्थिक अडचणीही वाढल्या आहेत. अनेक अर्जदार कर्ज काढून वा क्रेडिट कार्डने अनामत रक्कम भरतात. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या अर्जदारांकडून सातत्याने सोडतीच्या तारखेबाबत पुणे मंडळाकडे विचारणा होत आहे. सोडत लवकरच काढण्याची मागणी होत आहे. मात्र आचारसंहितेमुळे सोडत आता काढणे शक्य नसल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आचारसंहितेत सोडत काढता येईल का याबाबतची तपासणी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडेही याबाबत विचारणा करण्याचा विचार सुरू आहे. तसे झाले तर सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. मात्र आचारसंहितेत सोडत काढण्याची परवानगी मिळणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच अर्थात १६ जानेवारीनंतरच सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.