मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४४६२ घरांच्या विक्रीसाठी २४ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू असून वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबरला अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार होती. पण अद्याप ज्या इच्छुकांनी या घरांसाठी अर्ज केलेला नाही, त्यांना आता पुणे मंडळाने दिलासा दिला आहे. पुणे मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे.

आता १५ सप्टेंबरऐवजी १५ ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, या मुदतवाढीमुळे १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणारी सोडत आता लांबणीवर पडली असून सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

पुणे मंडळाला १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४९१ घरे उपलब्ध झाली आहेत. तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत २९७१ घरे मंडळाला सोडतीसाठी मिळाली आहेत. त्यानुसार या एकूण ४४६२ घरांच्या सोडतीसाठी पुणे मंडळाने ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली. तर १४ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृतीस सुरुवात केली. या सोडतीत ११ लाखांपासून ६४ लाखांपर्यंत किंमतींच्या घरांचा समावेश आहे. या घरांसाठी इच्छुकांना १५ सप्टेंबरला रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार होता. तरआरटीजीएस वा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंतची मुदत होती. त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी सुरू होईल. अर्जांची छाननी पूर्ण करून २९ सप्टेंबरला अर्जांची प्रारूप यादी सायंकाळी ७ वाजता जाहीर केली जाणार होती. तर ८ ऑक्टोबरला अर्जांची अंतिम यादी सायंकाळी ७ वाजता जाहीर करून १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता ४४६२ घरांसाठी सोडत काढली जाणार होती. अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता पुणे मंडळाने सोडतीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोर यांनी यास दुजोरा दिला.

तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ

नव्या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, मूळ वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला सोडत काढली जाणार होती. मात्र आता मुदतवाढीमुळे सोडतही लांबणीवर पडली असून सोडतीची नवीन तारीख अद्याप मंडळाने जाहीर केलेली नाही. एक-दोन दिवसांत ही तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्यासाठी अर्जदारांना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने, तसेच गणेशोत्सवादरम्यान अनेकांना अर्ज भरणे शक्य होत नसल्याने सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत ५४ हजार अर्ज

पुणे मंडळाच्या ४४६२ घरांच्या सोडतीला अर्जदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. १० सप्टेंबरपर्यंत ५४ हजारांहून अधिक अर्ज सादर झाल्याची माहिती साकोरे यांनी दिली. अवघ्या १७ दिवसांत ५४ हजारांहून अधिक अर्ज सादर झाले असून हा प्रतिसाद पाहता महिन्याभराच्या कालावधीत या सोडतीसाठी एक लाखांहून अधिक अर्ज सादर होण्याची शक्यता आहे.