मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अखत्यारितील विविध वसाहतींमधील २९५ सदनिकांची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार ४ मेपासून ऑनलाइन पद्धतीने घरविक्रीस सुरुवात होणार होती. मात्र या प्रक्रियेस सुरुवात होण्याआधीच या विक्रीत खोडा निर्माण झाला आहे. प्रथम प्राधान्य योजनेत सहभागी होण्यासाठी जी काही कागदपत्रे इच्छुकांना लागणार आहेत, ती कागदपत्रे उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. कारण आपले सरकार संकेतस्थळात काही तांत्रिक अडचणी असल्याने इच्छुकांना कागदपत्रे उपलब्ध होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोमवारी, ४ मेपासून सुरू होणारी घरविक्री आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही विक्री आता १३ मेपासून सुरू होणार आहे.

चिखली, ताथवडे, वाकडसह अन्य ठिकाणची घरे पुणे मंडळाच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील २९५ घरे रिक्त राहिली आहेत. चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरांतील २९५ घरे पुणे मंडळाला २० टक्के आणि १५ टक्के योजनेअंतर्गत उपलब्ध झालेली ही घरे आहेत. म्हाडाच्या नियमाप्रमाणे या रिक्त घरांची विक्री अखेर प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेत २३ एप्रिलला यासंबंधीची जाहिरात पुणे मंडळाने प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार सोमवारी, ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून या घरांच्या विक्रीस सुरुवात होणार होती.

https://bookmyhome.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने इच्छुकांना अर्ज भरता येणार होता. कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पुणे मंडळाच्या जाहिरातीनुसार प्रथम प्राधान्य योजनेत सहभागी होत आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुकांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली होती. मात्र आपले सरकार संकेतस्थळावर काही तांत्रिक अडचणी असल्याने उत्पन्नाचा दाखला, वास्तव्याचा दाखला यासह अन्य कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पुणे मंडळाकडे येत होत्या. दरम्यान ही प्रथम प्राधान्य योजना असल्याने जो कोणी सर्वात आधी अनामत रकमे सहित अर्ज सादर करेल त्याला घर वितरित केले जाते. अशावेळी कागदपत्रांच्या अभावी अनेकांना ४ मेपासून अर्ज करता येणार नसल्याने अखेर पुणे मंडळाने वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध करून ४ मेऐवजी १३ मेपासून २९५ घरांच्या विक्रीला सुरुवात होईल असे जाहीर केले आहे. मंडळाच्या निर्णयामुळे इच्छुकांना आता दिलासा मिळाला आहे. कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळाला आहे.

दरम्यान या योजनेविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास संबंधितांना म्हाडा लॉटरी मदत केंद्र, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, तळमजला, आगरकर नगर, पुणे येथे संपर्क साधता येईल. तसेच दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२८८५६, लॉटरी हेल्पलाईन ०२२-६९४६८०० तसेच अनामत रक्कम भरण्यासंबंधी सहाय्यासाठी ७०३०९००२६५ / १८००८९१८२९ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तसेच support.mhadapunelottery@easebuzz.in या ई-मेलद्वारेही संपर्क साधता येईल. …………….