मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून फेब्रुवारीमध्ये ४,१८६ घरांची सोडत काढण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वीच ताथवडेतील ७९२ घरांसाठीची सोडत पार पडली आहे. अशात आता पुणे मंडळाने पुण्यातील आणखी अंदाजे ४ हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. ही तयारी पूर्ण करून जुलैअखेरीस या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या या घोषणेमुळे पुण्यात खासगी विकासकाच्या प्रकल्पात परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घेण्याची संधी इच्छुकांना मिळणार आहे. कारण ४ हजार घरांपैकी अंदाजे ३ हजार घरे २० टक्के योजनेतील आहेत.

मुंबई महानगर प्रदेश, नाशिक येथे २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरे म्हणावी तशी उपलब्ध होत नसली, तरी पुणे मंडळाला मात्र मोठ्या संख्येने २० टक्के योजनेतील घरे उपलब्ध होत आहेत. पुणे मंडळाकडून सातत्याने संबंधित पालिकांकडे पाठपुरावा केला जात असल्याने गेल्या वर्षी मंडळाला २० टक्के आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील एकूण ४,१८३ घरे उपलब्ध झाली होती. या घरांसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये सोडतपूर्व प्रक्रिया सुरू केली, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये सोडत काढण्यात आली आहे. आता मंडळाला २० टक्के योजनेतील आणखी अंदाजे ३ हजार घरे उपलब्ध झाली आहेत. तेव्हा या ३ हजार घरांसह रिक्त अंदाजे १ हजार घरे मिळून एकूण अंदाजे ४ हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे.

जुलैअखेरीस ४ हजार घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. २० लाख ते ३० लाखांपर्यंतची घरे पिंपरी-चिंचवड पालिका, पुणे पालिका आणि पीएमआरडीएकडून मंडळाला अंदाजे ३ हजार घरे २० टक्के योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहेत. ही घरे अत्यल्प आणि अल्प गटासाठी असणार असून, ही घरे ३० ते ५० चौ. मीटरची असणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरांच्या किंमती २० लाख ते ३० लाख रुपये अशा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात परवडणाऱ्या दरात म्हाडाच्या माध्यमातून खासगी विकासकांच्या प्रकल्पात घर घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागावे, असे आवाहनही मंडळाने केले आहे.