मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४४६२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री प्रक्रिया अखेर शुक्रवारी संपुष्टात आली. शेवटच्या दिवसापर्यंत ४४६२ घरांसाठी तब्बल ३ लाख १ हजार ५८६ जणांनी अर्ज भरले असून, यातील २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. काही अर्जांची पडताळणी अद्याप शिल्लक असून, अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनामत रक्कमेसह अर्ज सादर करून प्रत्यक्ष सोडतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पुणे मंडळाला १५ टक्के एकात्मिक योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ४४६२ घरांसाठी २४ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू होती. मात्र, या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी लक्षात घेता मंडळाने या प्रक्रियेस तीन वेळा मुदतवाढ दिली. १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान महाआयटी प्रणाली काही कारणाने बंद असल्याने अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी ठप्प झाली. त्यामुळे सोडतपूर्व प्रक्रियेस तिसरी मुदतवाढ देण्यात आली. तिसऱ्या मुदतवाढीनुसार शुक्रवार, ३० ऑक्टोबरला नोंदणी आणि अर्जविक्री प्रक्रिया संपली. या कालावधीत ४४६२ घरांसाठी ३ लाख १ हजार ५८६ अर्ज सादर झाले. या अर्जदारांपैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सोडतीला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असून, आता अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. काही अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणीही शिल्लक आहे. पडताळणी पूर्ण झाल्यास आणि अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर ४४६२ घरांसाठीच्या एकूण अर्जांची संख्या अडीच लाखांपर्यंत वा त्यापुढे जाण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सोमवारी अंतिमतः किती अर्ज सादर होतात आणि किती अर्जदार सोडतीत सहभागी होतात, हे स्पष्ट होईल. दरम्यान, तीन वेळा दिलेल्या मुदतवाढीमुळे सोडतीची तारीख लांबणीवर पडली होती. आतापर्यंत सोडतीची तारीख पुणे मंडळाकडून निश्चित करण्यात आली नव्हती. पण आता मात्र मंडळाने सोडतीसाठी १ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे १ डिसेंबरला ४४६२ घरांसाठी सोडत पार पडेल आणि यात अडीच लाखांहून अधिक अर्जदार सहभागी होतील, हे निश्चित झाले आहे.
