लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाने पुण्यातील ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक असताना इच्छुक अर्जदारांना अर्ज भरण्यात मोठी अडचण येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्याने अर्जदारांमध्ये नाराजी आहे. वास्तव्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि प्राप्तिकर प्रमाणपत्राची पडताळणी होण्यास विलंब होत आहे. महाआयटीच्या संगणकीय प्रणालीत तांत्रिक बिघाड असल्याने त्याचा फटका अर्जदारांना बसत आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभाग महाआयटीकडे तांत्रिक बिघाड दूर करण्यासंबंधी पाठपुरावा करीत आहे.

पुणे मंडळाला १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १,४९१ घरे उपलब्ध झाली. तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत २,९७१ घरे मंडळाला सोडतीसाठी मिळाली. या एकूण ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी पुणे मंडळाने ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक अर्ज भरू न शकल्याने आणि इतर कारणांमुळे या प्रक्रियेस मंडळाने मुदतवाढ दिली. या मुदतवाढीनुसार आता १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक असताना मागील काही दिवसांपासून अर्जदार तांत्रिक अडचणींमुळे हैराण झाले आहेत.

उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा दाखला यांसारख्या कागदपत्रांची पडताळणी होण्यास वेळ लागत आहे वा पडताळणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचा फटका अर्जदारांना बसत आहे. याविषयी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मागील काही दिवसांपासून अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

महाआयटीच्या संगणकीय प्रणालीमध्ये अडचणी येत असल्याने काही कागदपत्रांची पडताळणी होत नाही वा त्यास वेळ लागत आहे. म्हाडाच्या सोडतीच्या संगणकीय प्रणालीत मात्र कोणताही बिघाड नाही, असेही साकोरे यांनी सांगितले. तर म्हाडाचा माहिती व संचार तंत्रज्ञान विभाग या अडचणी दूर करण्यासाठी महाआयटीशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देणार का, अशी विचारणा केली असता याबाबत म्हाडाचे उपाध्यक्षच निर्णय घेतील, असे साकोरे यांनी सांगितले.