लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४४६२ घरांच्या सोडतीसाठी सध्या मंडळाकडून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया गुरुवारी, १५ ऑक्टोबरला संपुष्टात येणार आहे. मात्र आता या प्रक्रियेस आठवड्याभराची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. अर्ज भरताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणी येत असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस आठवड्याभराची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावास आज सायंकाळपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोडतीचे सुधारित वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात येईल.

पुणे मंडळाला १५ टक्के एकात्मिक योजनेतील १,४९१ घरे उपलब्ध झाली. तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत २,९७१ घरे मंडळाला सोडतीसाठी मिळाली. या एकूण ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी पुणे मंडळाने ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक अर्ज भरू न शकल्याने आणि इतर कारणांमुळे या प्रक्रियेस मंडळाने मुदतवाढ दिली.

या मुदतवाढीनुसार आता १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असताना या प्रक्रियेस आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून अर्जदारांना तांत्रिक अडचणींमुळे अर्जस्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.

महाआयटीच्या संगणकीय प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा दाखला यासारख्या कागदपत्रांची पडताळणी होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेकडो अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी अपूर्ण आहे. नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असतानाही अनेकांची कागदपत्रांची पडताळणी अपूर्ण असल्याने अशा अर्जदारांना सोडतीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. या मागणीनुसार या प्रक्रियेस सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

यासंबंधीच्या प्रस्तावास म्हाडा उपाध्यक्षांकडून आज सायंकाळपर्यंत मान्यता दिली जाणार असून त्यानंतर सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा मुदतवाढ दिल्यास इच्छुकांना, अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या मुदतवाढीमुळे आता २५ नोव्हेंबरला काढली जाणारी सोडत लांबणीवर पडणार असून नवीन तारीख काय असणार, याकडे अर्जदारांचे लक्ष असणार आहे.