मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४१८६ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येऊन बरेच दिवस झाले तरी सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन लाख १५ हजारांहून अधिक अर्जदारांना सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपुष्टात आली. पुणे मंडळाने १६ किंवा १७ डिसेंबर रोजी सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून अंतिम तारीख एक-दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे.
पुणे मंडळाने २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३२२२ घरे आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील ८६४ घरे अशा एकूण ४१८६ घरांसाठी ११ सप्टेंबरपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवली. या मुदतवाढीमुळे २१ नोव्हेंबरची सोडत ११ डिसेंबरवर गेली, तर पुढे ११ डिसेंबरची सोडतही पुढे ढकलावी लागली. मात्र सोडतीची नवीन तारीख जाहीर न करताच पुणे मंडळाने सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार ४१८६ घरांसाठी अनामत रक्कमेसह दोन लाख १५ हजार ८४७ अर्ज सादर झाले. या अर्जांच्या माध्यमातून अनामत रक्कमेपोटी मंडळाकडे ४४६ कोटी ९७ लाख रुपये जमा झाले.
प्राप्त अर्जांची छाननी सध्या सुरू असून एक-दोन दिवसांत पात्र अर्जांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र या दोन लाखांहून अधिक अर्जदारांचे लक्ष सोडतीच्या तारखेकडे लागले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही. पण आता मात्र पुणे मंडळाने १६ किंवा १७ डिसेंबर रोजी सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यासंबंधीचा अंतिम निर्णय, सोडतीची अंतिम तारीख एक-दोन दिवसात जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत पार पडावी यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची वेळ १६ किंवा १७ डिसेंबरपैकी ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी सोडत काढली जाणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे आता दोन लाखांहून अधिक अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान, या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एका घरामागे ५० हून अधिक अर्जदार प्राप्त झाले आहेत. आता दोन लाख १५ हजार अर्जदारांपैकी कोणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.
