मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४,४६२ घरांच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विक्री झालेल्या अर्जांची संख्या एक लाखापार गेली असून यातील ६४ हजार अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आता अर्ज भरण्यासाठी केवळ नऊ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या एक लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पुणे मंडळाला १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत १,४९१ घरे, तर २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत २,९७१ घरे उपलब्ध झाली आहेत. या एकूण ४,४६२ घरांसाठी पुणे मंडळाने ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून १४ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली होती. ही प्रक्रिया सुरू असताना काही तांत्रिक अडचणी आणि गणेशोत्सवादरम्यान नागरिक गावी जात असल्याने मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबरवरून थेट १५ ऑक्टोबरवर गेली. या मुदतवाढीमुळे १३ ऑक्टोबरला काढली जाणारी सोडत थेट २५ नोव्हेंबरवर गेली. या मुदतवाढीनुसार सध्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सोडतीसाठी

८२ हजारांहून अधिक अर्जांची विक्री झाली होती आणि ४४ हजारांहून अधिक अर्ज अनामत रक्कमेसह प्राप्त झाले होते. आता ही संख्या वाढत असून अर्जविक्रीच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

पुणे मंडळाच्या ४४६२ घरांच्या सोडतीसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत एक लाख १० हजार अर्ज सादर झाले आहेत. यातील ६४ हजार अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे अर्जदार सोडतीत सहभागी होतात. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज करणाऱ्यांची संख्या एक लाखापर्यंत जाईल, असा विश्वास पुणे मंडळाला आहे. पण नेमके सोडतीत किती अर्जदार सहभागी होतील हे १२ नोव्हेंबरला पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, २० टक्के योजना म्हाडाकडून काढून घेण्यात आली असून आता या योजनेची प्रक्रिया संबंधित पालिकांकडून राबविली जाणार आहे. योजना काढून घेण्याआधी पुणे मंडळाला २० टक्क्यांतील प्राप्त झालेल्या घरांचा समावेश या सोडतीत आहे. २० टक्के योजनेतील परवडणाऱ्या घरांची ही म्हाडाची शेवटची सोडत असून या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोडतीतील घरे परवडणारी असल्याचेही अर्जदारांकडून, इच्छुकांकडून सांगितले जात आहे.