मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून फेब्रुवारीमध्ये ४१८६ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत अयशस्वी ठरलेल्यांसाठी आणि पुण्यात म्हाडाच्या माध्यमातून घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ताथवडेतील ७९२ घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढण्याची तयारी पुणे मंडळाने सुरू केली आहे. ही घरे २ बीएचके असून या घरांच्या किंमती ६४ लाख ५० हजार रुपये आणि ६५ लाख ५० हजार रुपये असणार आहेत.

२२ मजली तीन इमारतीत घरे

पुणे मंडळाने काही वर्षांपूर्वी ताथवडे येथे काही कोटींमध्ये जमीन खरेदी केली आहे. या जागेवर मंडळाने मोठ्या संख्येने घरे बांधली. येथे टप्प्याटप्प्याने घरे बांधण्यात आली असून यातील पहिल्या टप्प्यातील अंदाजे ६८० घरे पूर्ण करून त्यांची विक्री करण्यात आली आहे. तर आता टप्पा २ मधील घरांचे काम वेगात सुरू आहे. या टप्प्यात ७९२ घरांचा समावेश असून २२ मजली तीन इमारतींमध्ये ही घरे आहेत. या घरांचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या तीन – चार महिन्यांत घरांचे १०० टक्के काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत या घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.

टप्पा २ मधील ७९२ घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे. मेमध्ये जाहिरात काढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. ताथवडे येथील ही घरे ७०० चौ. फुटांची आहेत. या घरांच्या किंमती ६४ लाख ५० हजार रुपये आणि ६५ लाख ५० हजार रुपये अशा असणार आहेत. ही घरे २ बीएचके असून या प्रकल्पात पंचतारांकित सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाहनतळ, क्लब हाऊस, जलतरण तलाव, सोलर ऑन-ग्रिड, ईव्ही चार्जिंग स्टेशन, व्यायामशाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा अनेक सुविधांचा यात समावेश आहे.

घरांची संख्या वाढण्याची शक्यता

सोडतीसाठी पुणे मंडळाकडे सध्या ताथवडे येथील ७९२ घरे उपलब्ध आहेत. घरांची संख्या वाढविण्याचाही मंडळाचा प्रयत्न आहे. त्यानुसार घरांची शोधाशोध सुरू आहे. सोडतीतील रिक्त, विखुरलेली काही घरे असतील तर त्याचा समावेश या सोडतीत केला जाईल. त्यामुळे घरांची संख्या काहीशी वाढण्याची शक्यता असल्याचेही साकोरे यांनी सांगितले.