MHADA Pune has announced the lottery : मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाने ताथवडे येथील ७९२ घरांच्या सोडतीची जाहिरात रविवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उद्यापासून, २७ एप्रिलपासून नोंदणी, अर्जविक्री, अर्जस्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ८ जुलैला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, या सोडतीतील घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील असून घरांच्या किमती ४६ लाख ते ६५ लाख ५० हजार रुपये अशा आहेत.
सोडत कधी ?
पुणे मंडळाने काही वर्षांपूर्वी ताथवडे येथील जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर दोन टप्प्यांत घरे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६०० हून अधिक घरे बांधून त्याची विक्री पूर्ण केली आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेऊन रविवारी या घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मध्यम गटातील ७९२ घरांसाठी उद्या, सोमवारी दुपारी दीड वाजल्यापासून नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तर २ जूनपर्यंत अनामत रक्कमेसह इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. ३० जूनला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर ८ जुलैला दुपारी १२ वाजता सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
कोणत्या गटासाठी किती घरे ?
७९२ घरांपैकी २४ घरे अल्प गटातील तर ७६८ घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत. अल्प गटातील घरे ५९.०८ चौ. मीटर ते ६०.६६ चौ. मीटर क्षेत्रफळाची असून या घरांच्या किमती ४६ लाख आणि ४७ लाख अशा आहेत. मध्यम उत्पन्न गटातील घरे ६९.३४ चौ. मीटर ते ७०.९२ चौ. मीटरची आहेत. या घरांच्या किमती ६४ लाख ५० हजार ते ६५ लाख ५० हजार रुपये अशा आहेत.
अनामत रक्कम किती ?
या सोडतीत सहभागी होण्यासाठी अल्प गटातील अर्जदारांना ५० हजार रुपये तर मध्यम गटातील अर्जदारांना ७५ हजार रुपये अशी अनामत रक्कम मोजावी लागणार आहे. तर ७०८ रुपये असे अर्जाचे शुल्क असणार असून ते विनापरतावा असेल. पुण्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत हक्काचे घर हवे असल्यास त्यासाठी अर्ज करून इच्छुकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
