मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांपैकी रिक्त ६३४ घरांच्या पुन्हा सोडतीसाठीची नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सोमवारी संपली. त्यानुसार या मुदतीत ६३४ घरांसाठी अनामत रकमेसह केवळ ४८४ अर्ज प्राप्त झाले. हा प्रतिसाद अत्यल्प असतानाच सामाजिक आरक्षणाअंतर्गत राखीव असलेल्या घरांसाठी कमी अर्ज आले आहेत. त्यामुळे सोडतीनंतर मोठ्या संख्येने ताथवडेतील घरे रिक्त राहण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टला सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नेमकी किती घरे रिक्त राहिली, हे स्पष्ट होईल.
ताथवडे येथील पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून या घरांसाठी सोडत काढण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच या घरांसाठी सोडत काढण्यात आली. मात्र, या महागड्या घरांना प्रतिसाद मिळाला नाही आणि ७९२ पैकी तब्बल ६३४ घरे विकली गेली नाहीत.
विक्रीविना रिक्त घरांसाठी १९ जुलैला पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार २० जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. तर सोमवारी ही प्रक्रिया संपुष्टात आली. दरम्यान, या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने अर्जविक्री-स्वीकृतीसाठी मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता होती. पुणे मंडळही त्याबाबत सकारात्मक होते.
मात्र, या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली नसून ही प्रक्रिया सोमवारी संपली. पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम मुदतीत ६३४ घरांसाठी ४८४ अर्ज सादर झाले आहेत. यातील सर्वाधिक अर्ज सर्वसाधारण गटातील घरांसाठी असून सामाजिक आरक्षणातील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे २५ ऑगस्टच्या सोडतीत ६३४ पैकी काहीच घरे विकली जाण्याची शक्यता असून मोठ्या संख्येने घरे रिक्त राहणार आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी नेमके किती अर्ज आले आणि त्यानुसार किती घरे प्रत्यक्षात विकली जाणार, हे आता २५ ऑगस्टलाच समजेल.
ताथवडेतील घरे विकली जावीत यासाठी पुणे मंडळाने या सोडतीत उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करून कोणत्याही उत्पन्न गटातील इच्छुकांना अर्ज करण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यानंतरही या घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता यापुढे रिक्त घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत करण्याचा विचार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासमोर ठेवू. त्यांनी मान्यता दिली, तर यासंबंधी अंतिम निर्णय घेऊन रिक्त घरे ‘प्रथम प्राधान्य’अंतर्गत विकू, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
