मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे येथील ६३४ घरांसाठी मंगळवारी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली. ही सोडत ६३४ घरांसाठी काढण्यात आली असली तरी अर्जदारांकडून प्रतिसादच न मिळाल्याने केवळ २७५ घरांची विक्री झाली. तर ३५९ घरे रिक्त राहिली.

पुणे मंडळाने काही वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ताथवडे येथील भूखंडावर दोन टप्प्यांत घरे बांधण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि सोडत काढून या घरांचे वितरण करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून या घरांसाठी काही महिन्यांपूर्वी सोडत काढण्यात आली. मात्र, या सोडतीला इच्छुकांचा, अर्जदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. घरांची किंमत अधिक असल्याने, तसेच अन्य काही कारणांमुळे इच्छुकांनी या घरांकडे पाठ फिरवली. त्यामुळेच सोडतीत ७९२ पैकी ६३४ घरे विकली गेलीच नाहीत. या घरांसाठी १९ जुलैला पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानुसार २० जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान ६३४ घरांसाठी केवळ ४८४ अर्ज सादर झाले. या सोडतीलाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सोडतीत मोठ्या संख्येने घरे रिक्त राहण्याची शक्यता होती. मंगळवारी ६३४ घरांसाठी सोडत पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे तब्बल ३५९ घरांना शून्य अर्ज प्राप्त झाल्याने ही घरे रिक्त राहिली आहेत.

ताथवडे येथील घरे विकली जावीत यासाठी पुणे मंडळाने या सोडतीत उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करून कोणत्याही उत्पन्न गटातील इच्छुकांना अर्ज करण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यानंतरही या घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच ६३४ घरांसाठी केवळ ४८४ अर्ज प्राप्त झाले असून सोडतीत प्रत्यक्षात केवळ २७५ घरे विकली गेली. तर ३५९ घरे रिक्त राहिली.

पत्रकारांसाठीच्या १९ घरांसाठी, स्वातंत्र्यसैनिकांच्या १८ घरांसाठी, लोकप्रतिनिधींच्या १५ घरांसाठी, म्हाडा कर्मचाऱ्यांसाठीच्या १५ घरांसाठी, कलाकारांच्या १४ घरांसाठी शून्य अर्ज प्राप्त झाल्याने ही घरे रिक्त राहिली आहेत. तर सामाजिक आरक्षणामधील घरेही मोठ्या संख्येने रिक्त राहिली आहेत. आता या रिक्त घरांसाठी पुणे मंडळ पुन्हा सोडत काढणार की या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.