मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांपैकी रिक्त ६३४ घरांसाठी पुन्हा सोडत काढण्यात येणार असून सध्या या घरांसाठी नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी आता केवळ सात दिवस शिल्लक असताना या घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ६३४ घरांसाठी केवळ १४६ अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे आता नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृतीस मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे मंडळाने ताथवडे येथील एक जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर दोन टप्प्यांत दीड हजारांहून अधिक घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून या घरांसाठी सोडत काढण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच या घरांसाठी सोडत काढण्यात आली. मात्र, या महागड्या घरांना प्रतिसाद मिळाला नाही आणि ७९२ पैकी तब्बल ६३४ घरे विकली गेली नाहीत. विक्रीवाचून रिक्त घरांसाठी १९ जुलैला पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ४६ लाख रुपये किमतीच्या १ बीएचके आणि ६४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २ बीएचके घरांसाठी २० जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू झाली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार १८ ऑगस्टला अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार आहे. यासाठी केवळ आठवडाभराचा कालावधी आहे. असे असताना या घरांना प्रतिसादच मिळालेला नाही.

घरे रिक्त राहण्याची शक्यता

पुणे मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६३४ घरांसाठी सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत केवळ १४६ अर्ज सादर झाले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. दरम्यान, अल्प आणि मध्यम गटातील या घरांना प्रतिसाद मिळावा यासाठी पुणे मंडळाने कोणत्याही उत्पन्न गटातील इच्छुकांना अर्ज करण्याची मुभा दिली आहे. मात्र, तरीही या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाची चिंता वाढली आहे. यावेळीही मोठ्या संख्येने घरे रिक्त राहणार असल्याने आता मंडळाला अर्जविक्री-अर्जस्वीकृतीस मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

मुदतवाढीसाठी सकारात्मक

याविषयी मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुदतवाढीबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मान्यतेने मुदतवाढ देण्यात येईल, असे सांगितले. मुदतवाढ दिली, तर २५ ऑगस्टला होणारी सोडतही लांबणीवर जाईल.