मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांपैकी तब्बल ६३४ घरे विक्रीवाचून रिक्त आहेत. या रिक्त घरांची पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतला आहे. त्यानुसार रविवारी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार सोमवारपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून २५ ऑगस्टला सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, ही घरे महागडी असल्याचे म्हणत इच्छुकांनी या घरांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुणे मंडळाने आता या घरांसाठी उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. कोणत्याही उत्पन्न गटातील इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

काही वर्षांपूर्वी पुणे मंडळाने ताथवडे येथील एक जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर दोन टप्प्यांत दीड हजारांहून अधिक घरांचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरांचे काम पूर्ण करून या घरांसाठी सोडत काढण्यात आली. तर आता दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच या घरांसाठी सोडत काढण्यात आली. मात्र, ही घरे महागडी असल्याने या घरांना प्रतिसाद मिळाला नाही आणि ७९२ पैकी तब्बल ६३४ घरे विकली गेली नाहीत. विक्रीवाचून रिक्त घरांसाठी अखेर रविवारी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंदाजे ४६ लाख रुपये किमतीच्या १ बीएचके आणि ६४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २ बीएचके घरांसाठी सोमवारपासून इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अल्प आणि मध्यम गटातील या घरांसाठी आता कोणत्याही उत्पन्न गटातील इच्छुक अर्ज करू शकणार आहेत. कारण या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने या घरांसाठी पुणे मंडळाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च गटातील इच्छुक अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान, सोमवारपासून सोडतपूर्व प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तर २३ ऑगस्टपर्यंत सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून २५ ऑगस्टला सोडत काढली जाणार आहे.

सोडतीचे वेळापत्रक

१९ जुलै – जाहिरात

२० जुलै – नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती

१७ ऑगस्ट – अर्जविक्री-स्वीकृतीची अंतिम मुदत

१८ ऑगस्ट – आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

२० ऑगस्ट – अर्जांची प्रारूप यादी

२२ ऑगस्ट – दावे-हरकती सादर करणे

२३ ऑगस्ट – पात्र अर्जांची अंतिम यादी

२५ ऑगस्ट – सोडत