मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे गृहप्रकल्पातील ७९२ घरांसाठी जूनमध्ये सोडत काढण्यात आली. मात्र या सोडतीतील अंदाजे ४५९ घरांना प्रतिसाद न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत. त्यामुळे आता या रिक्त घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचा विचार पुणे मंडळाने सुरू केला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे.
पुणे मंडळाकडून गृहनिर्मितीसाठी काही वर्षांपूर्वी ताथवडे येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. या जमिनीवर मंडळाकडून दोन टप्प्यांत घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन टप्प्यांत कामास सुरुवात करून पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरे बांधून या घरांची विक्री सोडतीद्वारे काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांचे काम सुरू असून या घरांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. घरांचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पुणे मंडळाने या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेत यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. जाहिरातीनुसार २७ एप्रिलपासून नोंदणी, अर्जविक्री व अर्जस्वीकृतीस सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करून जूनअखेरीस या घरांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीत दुसऱ्या टप्प्यातील अल्प उत्पन्न गटातील २४ घरांचा तर मध्यम उत्पन्न गटातील ७६८ घरांचा समावेश होता. या घरांच्या किंमती ४६ लाख रुपये ते ६५ लाख ५० हजार रुपये इतक्या होत्या. मध्यम उत्पन्न गटातील घरे इच्छुकांना महाग वाटल्याने या घरांना प्रतिसादच मिळाला नाही.
अल्प उत्पन्न गटातील २४ घरांसाठी अनामत रक्कमेसह ४६० अर्ज सादर झाले होते. तर मध्यम उत्पन्न गटातील ७६८ घरांसाठी केवळ ३०९ अर्ज आले आणि ४५९ घरे विक्रीविना रिक्त राहिली. दरम्यान, सोडतीनंतर विजेत्यांना तात्पुरती देकारपत्रे वितरित करण्यात आली असून विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतल्यानंतर घराचा ताबा दिला जाणार आहे. दुसरीकडे, रिक्त राहिलेल्या अंदाजे ४५९ घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचा विचार सुरू केल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. जुलैअखेरीस काढण्यात येणाऱ्या ४ हजार घरांच्या सोडतीत ताथवडेचा समावेश करायचा की ताथवडेसाठी स्वतंत्र सोडत काढायची, यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच, रिक्त घरांना प्रतिसाद मिळावा यासाठी मध्यम उत्पन्न गटातील ही घरे उच्च उत्पन्न गटात वर्ग करून सोडत काढता येईल का, याचाही विचार सुरू आहे. यावर अंतिम निर्णय घेऊन जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ताथवडेतील रिक्त घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
