मुंबई : दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात पुरेसे गाळे नाहीत. तर दुसरीकडे मात्र मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे. या घुसखोरांना संक्रमण शिबिरातील गाळ्यांतून बाहेर काढण्याचे आव्हान मंडळासमोर आहे. दुरुस्ती मंडळाने आठवडाभरापासून घुसखोरांना संक्रमण शिबिरातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत धारावीतील ३२ घुसखोरांना बाहेर काढण्यात मंडळाला यश आले आहे.

कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी दुरुस्ती मंडळाने मुंबईत विविध ठिकाणी संक्रमण शिबिरे उभारली आहेत. या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये अशा रहिवाशांना स्थलांतरित केले जाते. तर कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर रहिवासी संक्रमण शिबिरातून त्यांच्या पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घरात वास्तव्यास जातात. अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढत असून दुसरीकडे मंडळाकडे संक्रमण शिबिराचे पुरेसे गाळे नसल्याचे चित्र आहे.

सध्या उपलब्ध गाळ्यांमध्ये मोठ्या संख्येने घुसखोरी झाली आहे. म्हाडाच्या गाळ्यांत घुसखोरांची प्रचंड संख्या असून या घुसखोरांना काढणे म्हाडासाठी मोठे आव्हान ठरले आहे. मागील कित्येक वर्षांपासून घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर घुसखोरांविरोधात दंडात्मक कारवाई करून त्यांना अधिकृत करण्याची मागणीही होत आहे. या मागणीनुसार दंडात्मक कारवाई करून घुसखोरांना अधिकृत करण्याचा विचार राज्य सरकारचा करीत आहे. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नसून हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, संक्रमण शिबिरातील रहिवाशांची पात्रता-अपात्रता ठरविण्यासाठी, अर्थात घुसखोरांची संख्या निश्चित करण्यासाठी, दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणही करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण सध्या अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरातील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण शिल्लक आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू असतानाच आता मंडळाने धारावीतील संक्रमण शिबिरातील घुसखोरांविरोधात कारवाई सुरू केल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्याने दिली.

मागील आठवड्यापासून धारावीतील संक्रमण शिबिरातील घुसखोरांविरोधात पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ३२ घुसखोरांना बाहेर काढण्यात आले आहे. तर पुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. धारावीप्रमाणे इतर संक्रमण शिबिरातही ही कारवाई होणार आहे. मंडळाकडे संक्रमण शिबिराचे गाळे कमी असताना आता घुसखोरांविरोधातील कारवाईमुळे गाळ्यांची संख्या काहीशी वाढेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.