मुंबई : मुंबईतील म्हाडा वसाहतीतील जीर्ण इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाने समूह पुनर्विकासाला प्राधान्य दिले आहे. तर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूप यासाठी स्वीकारले आहे. या प्रारूपानुसार आतापर्यंत ११ प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता यात आणखी एका प्रकल्पाची भर पडणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने विक्रोळीतील टागोर नगर म्हाडा वसाहतीचाही मोतीलाल नगरच्या धर्तीवर सी अँड डी प्रारूपानुसार समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या पुनर्विकासात टागोर नगर अभिन्यासातील अंदाजे ३३४ चाळी आणि १० इमारतींचा समावेश असण्याची शक्यता आहे. या पुनर्विकासाअंतर्गत टागोर नगरचा कायापालट केला जाणार आहे.
म्हाडाने म्हाडा वसाहतीसह उपकरप्राप्त इमारती आणि त्यानंतर संक्रमण शिबिराचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. काही प्रकल्प म्हाडा स्वतः मार्गी लावणार आहे. तर बहुतांश पुनर्विकास प्रकल्प सी अँड डी प्रारूपानुसार मार्गी लावले जाणार आहेत. त्यानुसार सध्या म्हाडाने ११ प्रकल्प हाती घेतले आहेत. या ११ प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईतील एकूण ९२३ एकर जागेचा कायापालट केला जाणार आहे.
मोतीलाल नगर, वांद्रे रेक्लमेशन, आदर्श नगर, अभ्युदय नगर, जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत, सरदार वल्लभभाई पटेल नगर, बोरिवली जुनी म्हाडा वसाहत, चारकोप, गोराई, खार रामकृष्ण नगर या १० म्हाडा वसाहतींचा पुनर्विकासात समावेश आहे. तर उपकरप्राप्त इमारतींचा समावेश असलेल्या कामाठीपुरा परिसराचाही सी अँड डी प्रारूपानुसार म्हाडाकडून समूह पुनर्विकास केला जात आहे. या ११ प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांसाठी विकासकाची नियुक्ती झाली असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे. तर काही निविदा प्रक्रियेत असून काहींचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. आता यात आणखी एका प्रस्तावाची भर पडली आहे. मुंबई मंडळाने टागोर नगर म्हाडा वसाहतीचाही पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या वृत्तास मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दुजोरा दिला.
टागोर नगर म्हाडा वसाहत सुमारे ६ लाख ८० हजार चौ. मीटर जागेवर वसलेली असून यात ५४७० सदनिका आहेत. या वसाहतीत ६४ इमारती असून यातील ४० इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. तर १४ इमारतींचा पुनर्विकास सुरू असून १० इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचवेळी येथे ३५३ चाळी असून यातील दोन चाळींचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. तर १८ चाळींचा पुनर्विकास सध्या सुरू आहे. ३३४ चाळींचा पुनर्विकास शिल्लक आहे. तेव्हा येथील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या १० इमारतींसह ३३४ चाळींचा सी अँड डी प्रारूपानुसार समूह पुनर्विकास करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार पुनर्विकासाचा अभ्यास सध्या मंडळाकडून सुरू आहे. तर लवकरच पुनर्विकासाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. हा प्रस्ताव अंतिम झाल्यानंतरच टागोर नगरचा पुनर्विकास नेमका कसा होणार हे स्पष्ट होईल.
