समूह पुनर्विकासाची सक्ती?

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

दक्षिण आणि मध्य मुंबईत संख्येने अधिक असलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत आतापर्यंत फारसे कष्ट न घेतलेल्या म्हाडाने आता या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेतला आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच करील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्यासाठी काय करता येईल, याबाबत म्हाडामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. या इमारतींसाठी समूह पुनर्विकास योग्य असल्याने प्रामुख्याने इमारती संपादन करून रहिवाशांवर समूह पुनर्विकास लादण्याचा यापुढे म्हाडाचा प्रयत्न राहील, अशी चिन्हे आहेत.

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी १९६९ मध्ये इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची स्थापना करण्यात आली. दक्षिण व मध्य मुंबईतील सुमारे १९ हजार ६४२ जुन्या इमारतींच्या दुरुस्तीची आणि पुनर्विकासाची जबाबदारी या मंडळावर होती. परंतु आतापर्यंत ५० वर्षांच्या काळात काही इमारती कोसळल्यामुळे तर काहींचा पुनर्विकास झाल्याने आता १४ हजार २०७ जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची जबाबदारी मंडळावर आहे. या सर्व उपकरप्राप्त इमारतींचा तातडीने पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे.

या मंडळामार्फत आतापर्यंत फक्त ९४१ जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करून ४५४ इमारती बांधण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ३६ हजार ३८६ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मंडळाचा हा वेग पाहता पुढील १०० ते २०० वर्षे तरी या १४ हजार इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नाही. मंडळाकडे निधीची कमतरता असल्यामुळे विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) आणि ३३ (९) तयार करण्यात आली. त्यामुळे खासगी विकासक पुढे आले. खासगी विकासकांच्या २०७६ पुनर्विकास योजनांसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ देण्यात आली आहेत. त्यात ३७६० उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात फक्त ७४६ योजना पूर्ण होऊ शकल्या आहेत. त्यामुळे १२४५ जुन्या इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आता विकासकही पुढे येत नसल्याचे आढळून येत आहे.

‘सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट’ने भेंडी बाजाराचा कायापालट करण्याचे ठरविले. त्यानुसार मुंबईत पहिल्यांदाच मोठय़ा समूह पुनर्विकासाला राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानंतर कुणी विकासक पुढे आलेला नाही. त्यामुळे अधिकाधिक सवलती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याची अधिसूचना अलीकडेच काढण्यात आली. मात्र आता यासाठी म्हाडाने पुढाकार घ्यावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्यामुळे तूर्तास म्हाडाकडून धोकादायक इमारतींच्या संपादनावर भर दिला जाणार आहे. तसे झाले तरच म्हाडाला पुनर्विकास करता येणार आहे.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास तातडीने होण्यासाठी म्हाडामार्फत पुढाकार घेतला जाणार आहे. अनेक धोकादायक इमारती एकत्र करून समूह पुनर्विकासाच्या योजना तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी म्हाडाकडून या इमारतींच्या संपादनावर भर दिला जाणार आहे. एकदा म्हाडाच्या ताब्यात या इमारती आल्या की, समूह पुनर्विकास करणे शक्य होईल.

– दिनकर जगदाळे, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ