• भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू 
  • व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार

मंगल हनवते

मुंबई : म्हाडाकडे मुंबईत मोकळय़ा जमिनी नसल्याचे म्हटले जात असतानाच मुंबई मंडळाने अंदाजे आठ एकर जागेचा शोध घेतला आहे. वांद्रे पूर्व येथे अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा म्हाडाच्या मालकीची असून ती दुर्लक्षित होती. या जागेबाबत मुंबई मंडळ अनभिज्ञ असल्याने यातील काही जागेवर अतिक्रमण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया मंडळाने सुरू केली आहे. यावर मोठे व्यावसायिक संकुल उभारण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. व्यवसायिक संकुलाऐवजी या भूखंडाच्या विक्रीच्या पर्यायाचीही चाचपणी सुरू आहे.

वांद्रे रेक्लमेशन येथे म्हाडाच्या मालकीची मोठय़ा प्रमाणावर जागा असून त्या जागेकडे म्हाडाचे, मुंबई मंडळाचे बारीक लक्ष आहे. मात्र वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडणाऱ्या चौकापासून ते वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयापर्यंतची जागा म्हाडाच्या मालकीची याची कल्पनाही आतापर्यंत मुंबई मंडळाला नव्हती. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईत जमिनींचा शोध (लॅण्डबँक वाढविण्यासाठी) घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पश्चिम द्रुतगती मार्गला लागून अंदाजे आठ एकर जागा म्हाडाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

व्यावसायिक वापरासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावरुन बऱ्याच वर्षांपूर्वी म्हाडा आणि शहा नावाच्या एका व्यक्तीमध्ये वाद होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता.  मात्र शेवटी म्हाडाच्या बाजूने निकाल लागला आणि म्हाडाने यावर व्यवसायिक संकुल बांधण्याचा निर्णय घेतला; यादृष्टीने पुढे काहीच झाले नाही आणि हा भूखंडच म्हाडा, मुंबई मंडळाच्या विस्मरणात गेला. ही जागा मुंबई मंडळाकडून  लवकरच ताब्यात घेतली जाणार आहे. सध्या जिल्हाधिकारी आणि मुंबई मंडळ यांच्यात या जागेवरून काही वाद असून जागेची मोजणी करत जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. ही जागा ताब्यात आल्यास त्याचा व्यावसायिक वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार येथे व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार आहे. त्याचवेळी भूखंड विक्रीचाही पर्याय समोर आहे. हे विचार सध्या प्राथमिक स्तरावर आहेत. आजच्या घडीला ही जागा ताब्यात घेणे हेच महत्त्वाचे ध्येय आमच्या समोर त्यांनी स्पष्ट केले.

या भूखंडाबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांच्याबरोबर एक बैठक होणार आहे. त्यानंतर मोजणी करत भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. सध्या या भूखंडावरील ५० टक्के जागेवर अतिक्रमण असून ते हटविण्याचे आव्हान असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा भूखंड व्यवसायिक वापरासाठी असल्याने येथे मोठे व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार आहे. बीडीडीसह अनेक प्रकल्प सध्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून सुरू असून यासाठी मोठा निधी लागत आहे. अशावेळी येथे व्यवसायिक संकुल उभारत निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे.  जर व्यवसायिक संकुल उभारणे अशक्य ठरले तर या भूखंडाच्या विक्रीचाही पर्याय आमच्या समोर आहे.

– योगेश म्हसे , मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा