मुंबई : म्हाडाच्या विविध मंडळांच्या सोडतीतील शेकडो घरे विविध कारणांनी रिक्त राहत आहेत. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गतही काही घरे विकली जात नसल्याचे चित्र आहे. या रिक्त घरांमुळे म्हाडाचा महसूल अडकून राहत आहे. त्यामुळे आता म्हाडाने सोडतीत विक्रीविना रिक्त राहिलेली घरे भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्त्वावरील घरांच्या धोरणाअंतर्गत हा निर्णय घेतला असून, धोरण मंजूर होऊन भाडेतत्त्वावरील घरांसाठीचे स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यास त्यावर म्हाडाची रिक्त घरेही भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
महामुंबईत भाडेतत्त्वावरील घरांची वाढती मागणी आहे. २५ टक्के कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात. तर आता महामुंबईचा विकास ‘ग्रोथ हब’ म्हणून केला जात आहे. या ग्रोथ हबच्या अनुषंगाने भविष्यात शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग इतर कारणांसाठी महामुंबईत नागरिक येणार आहेत. अशावेळी भाड्याच्या घरांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणातही भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांच्या निर्मितीसह या घरांच्या वितरणाबाबतचे स्वतंत्र धोरण तयार केले आहे. हे धोरण मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे. या धोरणास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तर भाडेतत्त्वावरील घरांच्या वितरणासाठी म्हाडाकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जाणार आहे. यासाठीचे कंत्राट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) देण्यात आले असून, दोन महिन्यांत पोर्टल कार्यान्वित होणार आहे.
दरम्यान, भाडेतत्त्वावरील घरांची अधिकाधिक निर्मिती करण्यासाठी म्हाडाने आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात काही भाडेतत्त्वावरील घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता सोडतीतील विक्रीविना रिक्त राहिलेली घरेही भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडातील उच्चपदस्थ अधिकार्याने लोकसत्ताला दिली.
म्हाडाच्या विविध मंडळांतील शेकडो घरे भरमसाठ किमती आणि इतर कारणांमुळे सोडतीत विकली जात नसल्याचे चित्र आहे. दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे रिक्त राहत असल्याने म्हाडाने प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्यअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही घरे रिक्त राहत असून मंडळांचा महसूल अडकून राहत आहे. काही वर्षांपूर्वी रिक्त घरांची संख्या प्रचंड वाढल्याने म्हाडाने या घरांच्या विक्रीसाठी विविध पर्यायही स्वीकारले होते. त्यानुसार विरार-बोळींजमधील घरांची विक्री करण्यात आली असून, सध्या येथील अंदाजे ८०० घरे रिक्त आहेत. तर पुणे, मुंबई मंडळाचीही काही घरे रिक्त आहेत. त्यामुळे आता रिक्त घरे भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. भाडेतत्त्वावरील घरांचे धोरण मंजूर झाल्यानंतर म्हाडाच्या भाड्याच्या घरांच्या वितरणाचीही नियमावली निश्चित करून म्हाडाची रिक्त घरे भाड्याने पोर्टलद्वारे वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे यापुढे नागरिकांना परवडणार्या दरात म्हाडाची भाड्याची घरे उपलब्ध होणार असून, ही बाब दिलासादायक ठरणार आहे.
