मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वर्सोव्यातील आराम नगर अभिन्यासात १० मजली वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंदाजे ६३ कोटी रुपये खर्चाच्या वृद्धाश्रमाच्या इमारतीच्या बांधकामासाठी मुंबई मंडळाने फेब्रुवारीत निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी पाच निविदा सादर झाल्या होत्या. मात्र त्यातील एकही निविदा पात्र न ठरल्याने या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्याची नामु्ष्की मुंबई मंडळावर ओढवली आहे. या कामासाठी सोमवारी नव्याने निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रिया लांबल्याने आता वृद्धाश्रमाच्या कामासही विलंब होणार आहे.

एमएमआरमध्ये वृद्धाश्रमाची उभारणी

सर्वसामान्यांना म्हाडाच्या माध्यमातून सोडतीद्वारे हक्काचा निवारा दिला जातो. आता मात्र यापुढे जात म्हाडाच्या माध्यमातून विविध घटकांनाही कायमस्वरूपी वा तात्पुरता निवारा दिला जाणार आहे. त्यानुसार राज्याच्या गृहनिर्माण धोरणात वृद्धांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या निवाऱ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गृहप्रकल्प निर्मितीला चालना देण्यासाठी अनेक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास ‘ग्रोथ हब’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रोथ हबमध्येही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या निवाऱ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने एमएमआरमध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईत पहिले वृद्धाश्रम बांधण्याच्यादृष्टीने मुंबई मंडळाने ठोस पाऊले उचलली आहेत.

२३०६ चौ. मीटर जागेवर १० मजली वृद्धाश्रम

वर्सोवा, आरामनगर येथील २३०६ चौरस मीटर जागेवर अडीच चटईक्षेत्र निर्देशांकानुसार मुंबई मंडळ वृद्धाश्रम बांधणार आहे. १० मजली वृद्धाश्रमाच्या इमारतीचा आराखडा वास्तूरचनाकार शशी प्रभू यांनी तयार केला आहे.या वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी मंडळाने फेब्रुवारीमध्ये निविदा मागविल्या. यासाठी पाच निविदा सादर झाल्या. सीबी अँड सन्स, देव इंजिनीअरिंग, स्पेक्ट्रम, हर्ष कन्स्ट्रक्शन्स आणि बी. जी. शिर्के यांच्या या निविदा होत्या. मात्र तांत्रिक निविदेत किमान तीन निविदा पात्र ठरणे आवश्यक होते. मात्र एकही निविदा पात्र ठरली नाही. निकष पूर्ण होऊ न शकल्याने अखेर मंडळाला ही निविदाच रद्द करावी लागल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. फेब्रुवारीची निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर १ जूनला या प्रकल्पासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.