मुंबई : म्हाडामध्ये अधिकाऱ्यांमध्ये चक्क झटापट!; एकाचे निलंबन, तर दुसऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव|mhada was quite a fight between the officers suspension of one proposal for transfer of the other mumbai | Loksatta

मुंबई: म्हाडामध्ये अधिकाऱ्यांमध्ये चक्क झटापट!; एकाचे निलंबन, तर दुसऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव

राजकीय वरदहस्त असलेला हा वरिष्ठ अधिकारी बदली होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहे. गृहनिर्माण विभागातील एक उपसचिव यावेळीही त्यांच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे.

मुंबई: म्हाडामध्ये अधिकाऱ्यांमध्ये चक्क झटापट!; एकाचे निलंबन, तर दुसऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळातील एक वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक यांच्यात झालेल्या झटापटीची घटना सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. म्हाडाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
म्हाडामध्ये काही दिवसांपूर्वी ही घटना घडली असून ती आता या बदली प्रस्तावांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याबाबत याआधीही बाचाबाचीच्या घटना घडल्या आहेत.

कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सातत्याने अपमान करण्यात हा वरिष्ठ अधिकारी धन्यता मानतो, अशी त्याच्याविषयी नेहमी तक्रार असते. मात्र एका वरिष्ठ लिपिकाने असाच अपमान सहन केला नाही आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यास हाताने प्रत्युत्तर दिले. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. दोन्ही अधिकाऱ्यांची तक्रार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली. मात्र असे प्रकार शासकीय कार्यालयात शोभत नाहीत वा कारवाई नाही झाली तर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ शकते, याची शक्यता वाटल्याने म्हाडा प्रशासनाने संबंधित वरिष्ठ लिपिकाला निलंबित केले तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील २३८ गावांमधील पुनर्वसनासाठी राखीव शेरे हटवले; जमिनींच्या खरेदी-विक्रीला मान्यता

राजकीय वरदहस्त असलेला हा वरिष्ठ अधिकारी बदली होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहे. गृहनिर्माण विभागातील एक उपसचिव यावेळीही त्यांच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे. या उपसचिवाला संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यानेच आपल्या शेजारी असलेले दक्षिण मु्ंबईतील १५०० चौरस फुटाचे सेवानिवासस्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे हा उपसचिव संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली वाचविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई व इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांना विचारले असता, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र म्हाडातील सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 15:55 IST
Next Story
‘सेस’ इमारतीमधील मालकांची दादागिरी संपवली, भाडेकरूंच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा – आशिष शेलार