मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणची अंदाजे १,४१९ घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही घरे २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील असून या घरांसंंबंधीचे प्रस्ताव विकासकांकडून मंडळाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून ही घरे मिळविण्यात येणार असून या घरांचा कोकण मंडळाच्या आगामी सोडतीत समावेश करण्यात येणार आहेत.
आचारसंहित जारी होण्यापूर्वी अंदाजे ७००० घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन कोकण मंडळ करीत आहे. ही जाहिरात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीत २० टक्के आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील अंदाजे १,४१९ घरांचा समावेश असणार आहे. ठाणे महानगरपालिका, कल्याण – डोंबिवली महानगरपालिका आणि वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के योजनेतील १९ प्रस्ताव कोकण मंडळाकडे सादर झाले आहेत. या घरांची एकूण संख्या ५९४ इतकी आहे. कौसा येथील स्कायलार्क इन्फ्रा समूहाच्या प्रकल्पातील ४३ घरे, गोळवलीतील सनराज समूहाच्या प्रकल्पातील २८ घरे, चितळसरमधील महावीर समूहाच्या प्रकल्पातील २७ घरे, बाळकुममधील दोस्ती समूहाच्या प्रकल्पातील ४९ घरे, जोतिसगाव येथील गौरी विनाय बिल्डर्सच्या प्रकल्पातील ६४ घरे, कल्याणमधील थारवानी समूहाच्या प्रकल्पातील १४ घरे, कोलशेत येथील डीडी असोसिएट समूहाच्या प्रकल्पातील २४ घरे, टिटावाळा येथील थारवाणी समूहाच्या प्रकल्पातील ४१ घरांसह अन्य घरांचा यात समावेश आहे.
हेही वाचा – मुंबईः बेस्ट बस वाहकाला हल्ला करून चोरी करणाऱ्याला अटक
ठाण्यातील २० टक्क्यातील ५९४ घरांसह डोंबिवली येथील रुणवाल समूहाच्या प्रकल्पातील ८२५ घरेही कोकण मंडळाला उपलब्ध होणार आहे. ही घरे १५ टक्के एकात्मिक योजनेतील असून ही घरे मंडळाकडे वर्ग करण्यासंबंधीचा प्रस्तावही मंडळाकडे आला आहे. आता पुढील कार्यवाही करून ही १४१९ घरे मंडळाच्या आगामी सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ही घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असून ३०० ते ५०० चौरस फुटांची आहेत. तर या घरांच्या किंमती २० ते ३० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या घरांचा सोडतीत समावेश करण्यासंबंधीची कार्यवाही मंडळाकडून सुरू आहे. या घरांच्या किंमतीही निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे कोकण मंडळाच्या सोडतीत खासगी विकासकाच्या प्रकल्पातील १,४१९ घरांचा पर्याय इच्छुकांसाठी उपलब्ध असणार आहे.