मुंबई : एमएचटी सीईटी देण्याची इच्छा असलेल्या, मात्र काही कारणास्तव अर्ज नोंदणी करणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) दोन दिवसांची विशेष मुदतवाढ दिली होती.
सीईटी कक्षाने दिलेल्या मुदतीमध्ये नाेंदणी करण्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १९ व २० मार्च या दोन दिवसांमध्ये राज्यभरातून तब्बल ८ हजार ५८० विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटीसाठी नोंदणी केली. त्यामुळे एमएचटी सीईटीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ११ लाख ६४ हजार ७३५ इतकी झाली आहे.
अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेली अर्ज नोंदणी प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी संपली. मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव अर्ज भरणे शक्य झाले नसल्याच्या तक्रारी करीत सीईटी कक्षाकडे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.
राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी दूरध्वनी, ई-मेल व पत्राद्वारे सीईटी कक्षाकडे विनंती केली. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सीईटी कक्षाने विशेष बाब म्हणून प्रवेश नोंदणीची विलंब शुल्कासह १९ व २० मार्च २०२६ अशी दोन दिवस मुदतवाढ दिली. तसेच अर्ज न भरलेल्या विद्यार्थांनी तत्काळ ते भरावेत, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले होते.
त्यानुसार या दोन दिवसांमध्ये एमएचटी सीईटी अंतर्गत पीसीएम व पीसीबी या दोन्ही परीक्षांसाठी तब्बल ८ हजार ५८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये पीसीएम गटातील पहिल्या संधीसाठी ३ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर दुसऱ्या संधीसाठी १ हजार ६०१ अशी एकूण ५ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे पीसीबी गटातील पहिल्या संधीसाठी २ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या संधीसाठी ६८५ विद्यार्थी, अशी एकूण ३ हजार १५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एमएचटी सीईटी परीक्षा देणार ११ लाख ६४ हजार विद्यार्थी
पीसीएम गटाच्या सीईटीच्या पहिल्या संधीसाठी ४ लाख ७९ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दुसऱ्या संधीसाठी २ लाख ९६ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही संधी मिळून ७ लाख ७५ हजार ८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीबी गटाच्या सीईटीच्या पहिल्या संधीला २ लाख ८४ हजार ०५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दुसऱ्या संधीला १ लाख ०४ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दोन्ही संधी मिळून ३ लाख ८८ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही संधी मिळून ११ लाख ६४ हजार ७३५ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
