मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटीच्या पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करण्यास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) एक दिवसाची विशेष मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या संधीसाठी नाेंदणी केली नाही, अशा विद्यार्थ्यांना २३ एप्रिल रोजी एक दिवस नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
एमएचटी सीईटीच्या दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे प्रत्यक्ष भेट देऊन, ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी विलंब शुल्कासह एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २३ एप्रिल रोजी नावनोंदणी करता येणार आहे. दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे. दुसऱ्या संधीसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱ्या संधीसाठी ४ लाख २६ हजार २८४ विद्यार्थ्यांची नोंदणी
महाराष्ट्रातील एमएचटी सीईटीच्या (पीसीएम व पीसीबी) विद्यार्थ्यांना प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी दिल्या जात आहेत. आजपर्यंत या सीईटीसाठी दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख २६ हजार २८४ इतकी आहे. एमएचटी पीसीएम सीईटीच्या दुसऱ्या संधीसाठी ३ लाख १४ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर एमएचटी पीसीबी सीईटीच्या दुसऱ्या संधीसाठी १ लाख ११ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यापूर्वीही दिली होती विशेष मुदतवाढ
एमएचटी सीईटी पीसीएम पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी यापूर्वी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून १५ व १६ एप्रिल रोजी विशेष मुदतवाढ दिली होती. या विशेष मुदतवाढीला चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसांत पीसीएम व पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी २४ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये पीसीएम समूहासाठीच्या सीईटीसाठी १७ हजार ९२२, तर पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ७ हजार १२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दुसऱ्या संधीची पीसीबी समूहाची सीईटी १० व ११ मे २०२६ रोजी, तर पीसीएम समूहाची सीईटी १४, १५ व १६ मे २०२६ रोजी होणार आहे.
