मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटाच्या सीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने घेतला आहे. रोजी राष्ट्रीय स्तरावरील तीन महत्त्वाच्या परीक्षा १२ एप्रिल आयोजित केल्या आहेत. त्यामुळे त्या दिवशी सीईटी ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी अनेक विद्यार्थी व पालक यांनी केली होती.
या मागणीचा विचार करून सीईटी कक्षाने ११ ते २० एप्रिल या दरम्यान होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच विद्यार्थ्याला तीन-तीन वेळा तात्पुरते प्रवेशपत्र आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.
सीईटी कक्षाने यंदा पीसीएम गटाची सीईटी ११ ते २० एप्रिलदरम्यान आयोजित केली आहे. मात्र १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह (एनडीए), सीडीएस आणि नाटा या राष्ट्रीय स्तरावरील तीन प्रवेश परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यापैकी एनडीएची परीक्षा बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही देत असल्याने आणि त्याच दिवशी सीईटी होणार असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती. त्यामुळे सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकातून १२ एप्रिलचा दिवस वगळण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली होती. या मागणीची दखल घेत सीईटी कक्षाने १२ एप्रिल रोजी होणारी पीसीएम गटाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे तात्पुरते प्रमाणपत्र आणि सिटी इंटिमेशन स्लिप ५ एप्रिलपासूनच मिळण्यास सुरुवात झाली आहे. वेगळ्या शहरात किंवा तालुक्यात परीक्षा असेल तर विद्यार्थ्यांना प्रवासाचे नियोजन सोपे व्हावे, यासाठी सीईटी कक्षाने यंदा विद्यार्थ्यांना आगाऊ सूचना देण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबईतील काही विद्यार्थ्यांना एकदा-दोनदा नाही, तर तीन तीन वेळा वेगवेगळी तात्पुरती प्रमाणपत्रे मिळाल्याची तक्रार आहे.
दरम्यान, केंद्रांच्या संख्येनुसार आणि उपलब्धतेनुसार विद्यार्थ्यांचा समावेश कोणत्या दिवशी आणि कोणत्या केंद्रावर करणार, याबाबतच्या सूचना दिल्या जातात. विद्यार्थ्यांना ७ एप्रिलपासून अंतिम प्रवेशपत्र प्राप्त होणार असून त्यावर असलेले परीक्षा केंद्र, पत्ता आणि तारीख निश्चित मानावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
