मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूहाच्या परीक्षेला शनिवारपासून सुरूवात होत आहे. ही परीक्षा ११ ते २० एप्रिल रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. राज्यभरातून तब्बल ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. पीसीएम समूहाच्या सीईटीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यांतील १९८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

पीसीएम परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यंदापासून प्रथमच विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी देण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. त्यानुसार शनिवारपासून सुरू होणाऱ्या पीसीएम समुहाच्या पहिल्या संधीची परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान होणार आहे. या संधीसाठी राज्यभरातून ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच दुसऱ्या संधीची सीईटी १४ ते १६ मे २०२६ दरम्यान होणार आहे. दुसऱ्या संधीनुसार २ लाख ९६ हजार ५५३ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत व दोन्ही संधी मिळून ७ लाख ७५ हजार ८८५ विद्यार्थी पीसीएम समूहाची सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी

राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन ) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार सीईटी कक्षाने या वर्षापासून प्रथमच एमएचटी सीईटी (पीसीएम समूह), एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) व एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करतानाच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक हे ठरवायचे आहे. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त पर्सेंटाईल असलेला निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

पीसीएम समूहाच्या नोंदणीमध्ये १५ हजाराने वाढ

प्रवेश नोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणी मागील वर्षापेक्षा जास्त झाली आहे. २०२५ च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेसाठी ४ लाख ६४ हजार २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा या परीक्षेसाठी ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १५ हजार ७० ने वाढ झाली आहे. यंदा झालेल्या नोंदणीमध्ये २ लाख ८९ हजार ७०७ विद्यार्थी व १ लाख ८९ हजार ६०४ विद्यार्थिनी आहेत. तसेच यामध्ये २१ तृतीयपंथी, २ हजार ७५० अनाथ विद्यार्थी व २ हजार ६० अपंग विद्यार्थ्यांचा समावेश आहे.