‘मी मुख्यमंत्री बोलतोय’द्वारे फडणवीसांचा जनसंवाद

PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभार करण्यास सुरुवात केली आहे. मोदी हे ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत असताना, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातून दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिला कार्यक्रम रविवारी पार पडला.

पंतप्रधान मोदी यांचा कित्ता मुख्यमंत्री अलीकडे गिरवू लागले आहेत. पंतप्रधान मोदी हे ‘मन की बात’ या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी आतापर्यंत ३० कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आकाशवाणी आणि एफ. एम. रेडिओचा वापर केला जातो.

मुख्यमंत्र्यांनीही जनतेशी थेट संवाद साधण्याकरिता नवीन उपक्रम सुरू केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इमेल, समाजमाध्यम किंवा थेट प्रश्न जनतेकडून मागविले जातात. त्याला मुख्यमंत्री उत्तर देतात. या उपक्रमांतर्गत पहिला ‘संकल्प शाश्वत शेती’चा हा कार्यक्रम रविवारी पार पडला. दूरदर्शन सह्य़्राद्री वाहिनीबरोबरच आकाशवाणीच्या अस्मिता कार्यक्रमात हा संवाद ऐकण्याची संधी जनतेला मिळणार आहे.

राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले. ‘संकल्प शाश्वत शेतीचा’ या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी तसेच शेतीशी संबंधित अन्य प्रश्नांवर भूमिका मांडली.