ऐंशीच्या दशकात मायकल जॅक्सन नावाचा संगीतमय झंझावात जगावर गारुड करून होता. मायकल जॅक्सनचं गाणं, त्याचं संगीत, त्याचा पदन्यास, त्याचं असणं, त्याचं दिसणं सगळंच विलक्षण होतं. जगावेगळा, कुठल्याही एका साच्यात न बसणारा, काळाच्या पुढे असलेल्या मायकल जॅक्सन नावाच्या जादुगाराचं आयुष्य जितकं वलयांकित होतं तितकंच गूढरम्यही होतं. मायकल जॅक्सन नावाचा आठव पुन्हा उलगडण्याचं कारण ठरला आहे तो सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आंत्वां फुक्वा दिग्दर्शित ‘मायकल’ नावाचा चरित्रपट.

लहानपणापासून विचित्र मानसिकतेत वाढलेला मायकल ते लहान वयापासून प्रसिद्धीच्या झोतात राहिलेलं, असंख्य वाद, गैरसमज यांनी पोळून निघालेलं आयुष्य असं पुरेपूर नाट्य असलेल्या या प्रतिभावान गायक-संगीतकाराच्या आयुष्यावरचा चरित्रपट प्रेक्षकांसमोर यायला अंमळ उशीरच झाला आहे.

जिवंतपणी आख्यायिका बनून राहिलेल्या मायकल जॅक्सनसारख्या व्यक्तीचं आयुष्य दोन किंवा तीन तासांच्या चित्रपट स्वरूपात पडद्यावर मांडणं हे सोपं नाही. एकीकडे त्याची विलक्षण अशी सांगीतिक कारकीर्द आहे, त्याची गायक म्हणून होणारी जडणघडण, गाजलेली गाणी, त्याचे गाजलेले दौरे हा त्याच्या आयुष्यातला सर्वाधिक भारून टाकणारा प्रकार आहे. आणि दुसरीकडे मायकल जॅक्सन एक प्रथितयश गायक-संगीतकार म्हणून जगभरात वावरताना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून ते लहान मुलांचे लैंगिक शोषण करण्यासंदर्भात त्याच्यावर झालेले अनेक आरोप-प्रत्यारोप, त्यातून त्याची झालेली सुटका, नेव्हरलँड रँच नावाची त्याने उभारलेली जागा, लहान मुलांसाठी केलेलं सामाजिक कार्य, त्याच्यावर झालेलं कर्ज, सोनीबरोबरचा वाद अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र, आंत्वां फुक्वा दिग्दर्शित ‘मायकल’ या चित्रपटात त्याच्या आयुष्यातील वादविवादांना अजिबात स्पर्श केलेला नाही.

इंडियानामधील गॅरी शहरातील जॅक्सन कुटुंबापासून चित्रपटाची सुरुवात होते. जॅक्सन कुटुंबाचे कर्ताधर्ता जोसेफ जॅक्सन हे आपल्या ५ मुलांकडून दिवसरात्र गाण्याची तालीम करून घेत आहेत. गाणं नुसतंच गायचं नाही, तर ते लोकांना आकर्षित करेल अशा पद्धतीने नाचून सादर करायचं. त्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स शिकणं, गाणं आणि नृत्य यांतला ताल चुकता नये, यासाठी मुलांकडून कडक सराव करून घेणार्‍या जोसेफ यांचं आणि त्यांच्या छोट्या मुलाचं मायकलचं कधीच पटलं नाही. स्वतंत्रपणे, कुठल्याही बंदीविना स्वत:चं गाणं खुलवावं ही मायकलची इच्छा. मात्र, त्याच्या इच्छेची जोसेफ यांनी कधीच पर्वा केली नाही. लहानगा ६ वर्षांचा मायकल ‘जॅक्सन ५’ या त्यांच्या कौटुंबिक बँडचा मुख्य गायक झाला. ‘जॅक्सन ५’ या बँडचं यश, त्यांची सुरुवातीची ‘एबीसी’, ‘आय वाँट यू बॅक’, ‘आय विल बी देअर’सारखी गाजलेली गाणी, त्यांच्या सादरीकरणासह या चित्रपटात पाहायला मिळतात. ‘जॅक्सन ५’चा मोटाऊनशी झालेला करार, मोटाऊन रेकॉर्ड्सच्या बेरी गॉर्डी यांच्याकडून मायकलला मिळालेली प्रेरणा, आत्मविश्वास यामुळे एकीकडे त्यांचा बँड ऐन प्रसिद्धीच्या भरात असतानाच मायकलची स्वतंत्र गायक म्हणून ओळख मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. १९७९ मध्ये क्विन्सी जॉन्स यांच्या सहकार्याने तयार झालेला त्याचा पहिला अल्बम ‘ऑफ द वॉल’, त्यातलं त्याचं गाजलेलं गाणं ‘डोन्ट स्टॉप टिल यू गेट इनफ’ याचं सादरीकरण, पुढे ‘थ्रिलर’पर्यंत झालेला प्रवास दाखवतानाच त्याने मून वॉकसारखे नृत्याचे प्रकार शिकून घेणं, त्यासाठी स्थानिक नर्तक, गायक यांची मदत घेणं, गाण्याची व्हिडिओ फिल्म बनवण्यासाठी त्याने केलेली धडपड हे त्याच्या जडणघडणीचे सगळे पैलू या चित्रपटात पाहायला मिळतात. त्याच्या आयुष्यातील वादग्रस्त पर्वाची मांडणी करण्यापेक्षा ते वाद कसे खोटे होते, याची मीमांसा करणारी अनेक बारीकसारीक दृश्यं या चित्रपटात आहेत. वडिलांबरोबरचं त्याचं चिघळलेलं नातं, त्याचा त्याच्या बालमनावर झालेला परिणाम आणि त्यामुळेच पुढे तरुण वयातही समवयीन लोकांमध्ये राहण्यापेक्षा मुलांमध्ये त्याचं अधिक रमणं, अगदी शेवटच्या कौटुंबिक ‘व्हिक्टरी टूर’पर्यंत वडिलांच्या दबावाखाली असलेला मायकल या गोष्टींवर या चित्रपटात अधिक भर दिला गेला आहे. ‘बॅड’ या त्याच्या मोठ्या अल्बमपर्यंतचा त्याचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळतो. त्यानंतरचं त्याचं आयुष्य पुढच्या चित्रपटात पाहायला मिळेल, असं सूचक वाक्य चित्रपटाच्या शेवटी येतं. मात्र, खरोखरच चित्रपटाचा सिक्वेल येणार की नाही, यावर निर्मात्यांनी कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही.
‘मायकल’ची निर्मिती जॅक्सन कुटुंबीयांचीच आहे. त्यांचा प्रभाव चित्रपटाच्या निर्मितीवर जाणवत राहतो. आंत्वां फुक्वा यांनी अत्यंत सरळसोट पद्धतीने चित्रपटाची मांडणी केलेली आहे. सुरुवातीचं दृश्य सोडलं तर फ्लॅशबॅक तंत्र किंवा कुठल्याही वेगळ्या पद्धतीची मांडणी चित्रपटात पाहायला मिळत नाही.

एका सलगक्रमाने तुम्हाला मायकल जॅक्सनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना पडद्यावर दिसत राहतात. आणि तरीही हा चित्रपट कंटाळवाणा होत नाही, याचं बव्हंशी श्रेय मायकलची भूमिका करणारा अभिनेता जाफर जॅक्सन याला जातं. जाफर हा मायकलचा पुतण्या आहे. लहानपणी काका म्हणून मायकलचा थोडाफार सहवास अनुभवलेल्या जाफरने मायकलच्याच आवाजात बोलण्यापासून त्याची देहबोली, नृत्यकौशल्य सगळं आत्मसात करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांनी चित्रपटात खरी रंगत आणली आहे. सादरीकरण हा या चित्रपटाचा खरा आकर्षित करणारा भाग आहे. जाफर मायकलची भूमिका खरोखर जगला आहे. त्याने साकारलेला मायकल जॅक्सन आणि त्याचं व्यक्ती म्हणून घडत जाणं, कलाकार म्हणून खुलत जाणं पाहताना आपण जणू तो काळ वास्तवात अनुभवत असल्याची जाणीव हा चित्रपट पाहताना होते. मायकल जॅक्सनच्या चाहत्यांना पुन्हा एकदा जर त्याच्या आठवात चिंब व्हायचं असेल तर ‘मायकल’ या चित्रपटाला पर्याय नाही हे खरं.

दिग्दर्शक – आंत्वां फुक्वा

कलाकार – जाफर जॅक्सन, निया लॉंग, कॉलमन डोमिंगो.